ठाणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून हे मतदान सुरळीत पार पडावे, याकरिता राज्यभरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गाडीतून दारू आणि पैसे वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Election 2024 Case registered against Kedar Dighe for distribution of money and liquor from car)
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे उमेदवार केदार दिघे यांच्या गाडीतून गाडीतून दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यासोबतच त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरही या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गाडीतून दारू आणि पैसे वाटप करत असताना केदार दिघे स्वतः गाडीत उपस्थित होते आणि वाटप करत असताना शिंदेंच्या शिवसैनिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी वर्षा भोसले यांच्या तक्रारीवरून केदार दिघे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… Maharashtra Election 2024 : 113 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क; मुंबईत ज्येष्ठांमध्ये उत्साह
बुधवारी मध्यरात्री 1.45 ते 2 वाजेच्या दरम्यान अष्टविनायक चौकात पैसे आणि दारू वाटप करण्याचा प्रयत्न केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदीप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनित प्रभु, पांडुरगं दळवी, ब्रिद यांनी संगनमत करुन सचिन गोरीवले याच्या गाडीत दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांनी भरलेली 26 पाकिटे ठेवून अष्टविनायक चौकात वाटण्यासाठी आले होते, असा आरोप करण्यात आला आहे.
तर, याबाबत केदार दिघे म्हणाले की, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. काल रात्रीचा हा विषय आहे. मी ज्या गाडीत होतो ती गाडी पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासण्यासाठी अडवली होता. मी त्यांना विचारले देखील सर्व क्लिअर आहे का? त्यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मला जाण्याची परवानगी दिली होती. मात्र आता असे आरोप केले जात आहे. त्यामुळे हे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप दिघे यांच्याकडून करण्यात आला आहे.