घरठाणेठाणे शहर खड्डेमुक्त करणे ही सर्व यंत्रणांची जबाबदारी-आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे शहर खड्डेमुक्त करणे ही सर्व यंत्रणांची जबाबदारी-आयुक्त अभिजीत बांगर

Subscribe

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत खड्डेमुक्त ठाणे ही मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित व्हावी यासाठी रस्त्यांचे जाळे पसरविण्यात आले आहे. डांबरीकरण पध्दतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर पावसाळ्यात बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने या ठिकाणाहून वाहतूक करणे अत्यंत त्रासाचे होते त्यामुळे नागरिकांचा प्रत्यक्ष रोष महापालिकेवर असतो. पावसाळ्यात कोणत्याही रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत मान्सूनपूर्व करावयाच्या कामांसंदर्भात उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्राधिकरणांची पावसाळा पूर्व आढावा समितीची बैठक गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापालिकेचे नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपअभियंता विकास ढोले, रामदास शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते  विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मेट्रो पोलिटिन रिजन डेव्हलपमेंट (मेट्रो) आदी विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पावसाळापूर्व कामांचा आढावा मे किंवा जून महिन्यात घेवून त्याचा फारसा फायदा होत नाही. अजूनही पावसाळा सुरू होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे आताच जर खड्डे पडू नये यासाठी रस्त्यांची डागडुजी आणि रस्त्यांखालील कलव्हर्ट व नाल्यांची साफसफाई केली तर पावसाळ्याच्या दरम्यान रस्ते चांगले राहतील तसेच पाणी तुंबण्यामुळे रस्ते खराब होण्याच्या घटना कमी होतील, यासाठी बैठक आयोजित केली असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.डांबरीकरण पध्दतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी खड्डे पडत असतात, त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे होते, काही वेळा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. अंतर्गत रस्ते तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी मुख्य रस्ते हे महापालिकेसहीत वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करुन त्यांची निगा देखभाल त्यांच्या मार्फत करण्यात येते. परंतु कोणत्याही रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याचा दोष महापालिकेला दिला जातो. परंतु सर्वसामान्य नागरिकांना सदर रस्ता कोणत्‌या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आला आहे याची माहिती नसते. या पावसाळ्यामध्ये रस्त्यावर खड्डे असणार नाहीत या दृष्टीने वेळीच सर्व प्राधिकरणांनी नियोजन करुन मे अखेर पर्यत खड्डे पडणार नाही या दृष्टीने कार्यवाही करावे असे आदेश आयुक्त श्री. बांगर यांनी बैठकीत दिले. ज्या रस्त्यावर खड्डा आढळून येईल तो रस्ता ज्या प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घेण्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला

- Advertisement -

शहरातील 80 टक्के रस्ते हे महापालिकेच्या अखत्यारित येतात, त्यामुळे आपली जबाबदारी मोठी असल्याने सर्व अभियंत्यांना याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या असून रस्त्यांची कामे देखील सुरू झाली आहे. पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करणे शक्य नसल्याने वेळीच योग्यप्रकारे काम करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शासनाच्या माध्यमातून 605 कोटीचे अनुदान महापालिकेस प्राप्त झाले असून याची कामे सुरू असून या रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची व युद्धपातळीवर करावीत, या व्यतिरिक्त जी रस्त्यांची कामे सुरू आहे तेथेही पूर्ण लक्ष केंद्रीत करावे अशाही सूचना  यावेळी दिल्या. एखाद्या रस्त्यांवर खड्डा आढळून आल्यास कारण शोधण्यात वेळ न घालवता सदर रस्ता पूर्ववत करुन वाहतुकीस उपलब्ध होईल या दृष्टीने काम करण्यात यावे. महापालिका व इतर प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऑडिट करण्यास सुरूवात करणार असून यामध्ये रस्‌त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळ्यास व रस्त्यावर खड्डा पडल्यास यामध्ये ज्या प्राधिकरणाची चूक असेल त्या संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल असेही बांगर यांनी नमूद केले. मागील अनेक वर्षापासून काही रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत याची प्रत्यक्ष पाहणी करुन यादी तयार करावी व ही कामे युद्धपातळीवर होतील या दृष्टीने कार्यवाही करावी.

महापालिका क्षेत्रात सध्या पूर्वद्रुतगती महामार्गावर मेट्रो अंतर्गत कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी कामाचे डेब्रीज पडल्याचे दिसून येते, यामुळे वाहतुकीस अडचण होवून शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण होत आहे. मेट्रोच्या माध्यमातून निर्माण झालेले डेब्रीज संबंधितांनी तातडीने उचलावे, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरीगेटस लावण्यात यावेत. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील मुख्य रस्ते व चौकाच्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी, विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून कामे करण्यात येतात, यामध्ये रस्ता दुभाजक तयार करुन वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावण्यात येतात, हे दृश्य योग्य वाटत नाही. तरी याबाबत सर्व प्राधिकरणाने एकत्र येवून दुभाजकास एकच रंग लावण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच आवश्यकतेनुसार आवश्यक कलव्हर्ट, रंगरंगोटी, लेनमार्किंग, रिटेनिंग वॉल, पावसाळी पाण्याची गटारे आदी कामांची देखील पुर्तता करण्यात यावी.

- Advertisement -

मध्यंतरीच्या काळामध्ये मुंब्रा बायपासची संरक्षक भिंत ढासळली होती. आगामी काळात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी संपूर्ण रस्त्याचे पाहणी करुन आवश्यक ती कामे वेळीच करावीत. गेल्या पावसाळ्यात एमएमआरडीच्या ताब्यातील पुर्वद्रुतगती मार्ग, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील घोडबंदर रोड, मुंब्रा बायपास, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा अंतर्गत असलेल्या माजिवडा नाका ते आत्माराम पाटील चौक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येत असलेल्या शिळ ते महापे रस्ता, कल्याण फाटा ते महापे रस्ता व महापालिकेच्या अखत्यारितील ज्या रस्तयांवर खडडे पडले होते त्या संदर्भात विशेष काळजी घेण्याच्या सुचना बांगर यांनी दिल्या.  कशेळी रस्ता, चिंचोटी अंजूर रस्ता, मनोर –वाडा- भिवंडी रस्ता, कल्याण फाटा, शीळ –महापे रस्ता आदी ठिकाणच्या रस्त्यांची पाहणी करुन संबंधित प्राधिकरणांनी  आवश्यक ती कामे पावसा्ळ्यापूर्वी पूर्ण करावीत असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक लक्ष

महापालिका क्षेत्रातील संपूर्ण कामांवर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष असून वेळोवेळी त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. आजवर अनेक कामांसाठी त्यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आहे. आगामी काळात करावयाच्या कामासाठी निधीची आवश्यकता असल्यास आताच याचे नियोजन करण्यात यावे. भविष्यात याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. तरी महापालिकेसह इतर प्राधिकरणांनी देखील आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन करुन त्यांची अंमलबजावणी करावी असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -