ठाण्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने जोड्या जुळल्याच नाहीत

लग्न न झाल्याने ४० जोडपी पुन्हा आपापल्याच घरी

Rajasthan new marriage guidelines: Maximum 31 guests, 3-hour function; Rs 1 lakh fine for violations

लॉकडाऊनमध्ये कमी लोकांमध्ये आणि कमी खर्चात तेही कायदेशीर बाबी पूर्ण करून लग्नसोहळा ठाण्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात पार पडला जात आहे. मात्र, याच कार्यालयाची गुरुवारी अचानक इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित झाली आणि मुहूर्तावर लग्नाचा बार उडविण्यासाठी आलेल्या सुमारे ४० वधू-वरांसह वर्‍हाडी मंडळींना पुन्हा लग्नाशिवाय वधूवरांना घेऊन आपापल्या घरी परतावे लागले. त्यामुळे लग्नाच्या आणाभाका घेऊन आलेल्या नववधूवरांची पार निराशाच झाली आहे. तर, दोन दिवस सुरू असलेला घोळ किती काही केले तरी अजूनही सुटण्याचे नाव घेत नाही. त्यातच शनिवार-रविवार या दोन दिवस सुट्ट्या आल्याने सोमवारी पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच, संबंधित कार्यालयातून इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाताना दिसत आहे.

ठाणे दुय्यम निबंधक कार्यालयात (विवाह नोंदणी) रजिस्टर पद्धतीने लग्नाचा बार उडवला जातो. येथे मुहूर्ताची गरज पाहिली जात नाही. विशेष करून जागतिक व्हॅलेन्टाईन डे, १ जानेवारी किंवा विशेष तारखेला लग्नाच्या बेड्यात अडकण्यासाठी तरुणाई रजिस्टर लग्नाकडे वळली आहे. त्यातच कोरोना कालावधीत लग्नांवर आलेल्या निर्बंधांमुळेही कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न उरकताना दिसतात. मे महिना हा लग्नाचा महिना समजला जातो. या महिन्यात जास्तीतजास्त लग्नाचे मुहूर्त असतात. यावर्षी एकीकडे कोरोनामुळे दुसरीकडे लग्नाचे मुहूर्त असताना लग्नाची हौस-मौज बाजूला करून मुहूर्त साधण्यासाठी रजिस्टर मेजेस पद्धतीला पसंती दिल्याचे दिसत आहे. त्यातच ठाण्यात दिवसाला जवळपास सरासरी २० ते २५ जण सुखी संसाराला सुरुवात करतात.

सध्याच्या घडीला लग्नाचा मुहूर्त असल्याने २५ ते ३० जणांची नोंदणी ठाणे दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. त्यानुसार दररोज विवाहबद्ध होण्यासाठी नवदाम्पत्य येत असतात. गुरुवारी सकाळी नवदाम्पत्यांची ये-जा सुरू झाली आहे. एक-दोन नव्हेतर जवळपास १२ लग्न पार पडली. त्यानंतर अचानक कार्यालयाचा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या समोर आली. तातडीने याबाबत संबंधित कार्यालयाकडून एमटीएनएलकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी येऊन तपासणी कामाला सुरुवात केली. कार्यालयीन वेळ संपली तरी तो प्रॉब्लेम दुरुस्त झाला नाही. त्यामुळे विवाहाचा मुहूर्त काढून आलेल्या नवदाम्पत्यांसह त्या वर्‍हाडी मंडळींना लग्नाशिवाय घरी परतावे लागले. शुक्रवारीही सकाळी हा गोंधळ सुरू होता.

इंटरनेट कनेक्टिव्हिटी किती काही केले तरी सुरू होत नसल्याने पुन्हा आजच्या मुहूर्तावर लग्नाचा बार उडवू पाहणार्‍यांना नववर-वधूला आपापल्या घरी घेऊन वर्‍हाडी आलेल्या मंडळींना परतावे लागले आहे. अशाप्रकारे दोन दिवसात जवळपास ४० ते ५० नवदाम्पत्यांसह आलेल्या वर्‍हाडी मंडळींचा हिरमोड झाल्याचे पाहण्यास मिळाले.

‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने एमटीएनएलकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यांनाही नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे सेवा सुरू होण्यास वेळ लागत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने रजिस्टर पद्धतीने विवाह झालेले नाहीत. मात्र, नोंदणी करताना त्यांना सात दिवसांचा कालावधी दिलेला असतो. त्यामुळे ते सात दिवसात येऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करू शकतात.’ – जी.आर. पवार, दुय्यम निबंधक अधिकारी, ठाणे.