घरठाणेबदलापुरात 'माझी कन्या भाग्याची' अभियानाला सुरुवात

बदलापुरात ‘माझी कन्या भाग्याची’ अभियानाला सुरुवात

Subscribe
बदलापूर शहरात भाजपच्या वतीने ‘माझी कन्या भाग्याची’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शहरात कन्यारत्न झालेल्या पालकांना बेबी केअर किट गिफ्ट देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून, माजी नगरसेवक किरण भोईर आणि डॉक्टर रचना भोईर यांच्या माध्यमातून हे अभियान राबवले जात आहे. या अभियाना सोबतच सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होणाऱ्या मुलींचा आणि नव्यानं जन्मलेल्या मुलींचा अडीचशे रुपयांचा पहिला हप्ता माजी नगरसेवक किरण भोईर हे भरणार आहेत. रविवारी ‘माझी कन्या भाग्याची’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी या अभियानात ४८ कन्यारत्न प्राप्त झालेल्या पालकांना बेबी केअर किट गिफ्ट देण्यात आले.
बदलापूरच्या पश्चिम भागातील उत्सव हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, बदलापूर पश्चिम शहराध्यक्ष शरद तेली, महिला शहराध्यक्षा मीनल मोरे, प्रशांत कुलकर्णी, प्रवीण चौधरी, सागर घोरपडे, आदींच्या हस्ते बेबी केअर गिफ्टचे वाटप करण्यात आले. शिवजयंतीपासून सुरू करण्यात आलेले हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून बदलापूर शहरातील जास्तीत जास्त मुलींना बेबी केअर गिफ्ट आणि सुकन्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे किरण भोईर व डॉक्टर रचना भोईर यांच्या माध्यमातून ५० क्षयरोग रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे. या रुग्णांच्या सहा महिन्यांची पोषण आहाराची जबाबदारी भोईर यांनी घेतली आहे. यापूर्वी देखील अनेक क्षयरोग रुग्णांना पोषण आहाराचे वाटप केले आहे त्यांच्या या कार्याबाबत त्यांना राज्यपालांच्या हस्ते ,निक्षय मित्र, हा पुरस्कार देखील मिळाला आहे. शिवजयंतीनिमित्त ‘माझी कन्या भाग्याची’ हे अभियान सुरू केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी किरण भोईर यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -