भिवंडीत प्रतिदिन २ दशलक्ष पाणी पुरवठ्यास मंजुरी

भिवंडीसाठी प्रतिदिन २ दशलक्ष अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठीची मंजुरी मुंबई पालिकेत सोमवारी झालेल्या एका बैठकीत दिली.

भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नातून मुंबई महापालिकाने प्रतिदिन २ दशलक्ष अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठीची मंजुरी मुंबई पालिकेत सोमवारी झालेल्या एका बैठकीत दिली. त्यामुळे भिवंडी शहरातील नागरिकांची तहान भागण्यास मोठी मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे.

भिवंडी शहराला मुंबई महापालिका आणि स्टेम प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा होत आहे. परंतु शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजमितीला सुमारे दहा ते बारा लाख लोकसंख्या शहराची आहे आणि त्यात वाढत्या गोडावून क्षेत्रामुळे, वाढत्या नागरिकरणामुळे नवीन रहिवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. आणि त्यात भर म्हणजे पाणी चोरी आणि पाणी गळती या सर्वांमुळे आजमितीला होणारा पाणीपुरवठा हा कमी पडत आहे. त्यामुळे पाणी टंचाई होऊन नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे पाण्यावाचून होणारे हाल लक्षात घेऊन आमदार रईस शेख यांनी ३० सप्टेंबर आणि ९ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि सतत पाठपुरावा करून शहराला २ दशलक्ष अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर करून घेण्यात त्यांना यश मिळवले आहे.

या अतिरिक्त पाणी मंजुरीमुळे भिवंडी शहरातील सतत पाणी टंचाई असणारे साइरा नगर, वकील कंपाऊंड, फातिमा नगर, ६० फिट रोड, उम्मत नगर, मन्सूरबाद, गायत्री नगर चौक, राम नगर, चाविन्द्रा डम्पिंग ग्राउंड झोपडपट्टी, गायत्री नगर पहाडी,फैझी पीर दर्गा, नूरी नगर,डोंगर पाडा, न्यू आझाद नगर,आझाद नगर आला हजरत चौक आदी परिसरातील हजारो नागरिकांची तहान भागण्यास मोठी मदत होणार आहे. या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेख यांनी आपल्या आमदार निधीतून ३० लाख रुपये देण्याची तयारी केली आहे आणि तसे त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे आणि जिल्हा नियोजन अधिकारी ठाणे यांना कळविले आहे. या बैठकीस आमदार रईस शेख यांच्यासह मुंबई पालिकेचे जल अभियंता राठोड, उपजल अभियंता, भिवंडी महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.