खबरदारी बाळगूनही ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे गायब

बँक बाबत कोणतीही माहिती किंवा ओटीपी नंबर शेअर न करताही उल्हासनगर मधील एका बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढण्यात आली असल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली. ठगांपासून सावध राहण्यासाठी बँक आणि पोलिसांकडून बँक खात्यांची वैयक्तिक माहिती आणि ओटीपी कुणालाही प्रसारमाध्यमांद्वारे देऊ नका, अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत.  मात्र शहरात एक  घटना समोर आली आहे ज्यात अज्ञात इसमाने एका खातेदाराच्या बँक खात्यातून कोणतीही माहिती आणि ओटीपी शेअर न करता 5 हजार 661 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले आहेत.

उल्हासनगर ३ गणेशनगर ओटी रोडच्या श्यामसुंदर सोसायटीसमोर सुरेश चौहान हे कुटुंबियांसह राहतात. सुरेश यांचे एका बँकेत बचत खाते आहे.  एक जानेवारी रोजी दुपारी अचानक मोबाईलवर  बँकेचा ईमेल व मोबाईलवर मेसेज आला.   बँकेच्या खात्यातून 3 हजार 60 रुपये ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर करण्यात आले आहेत.  लगेच पुन्हा 2 हजार 601 रुपये परत काढण्यात आले. चौहान दुपारी ३.१५ वाजता संबंधित बँक उल्हासनगर शाखेत गेले आणि यासंदर्भात चौकशी केली .
सुरेश चौहान यांनी बँक प्रशासनाकडे  त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याची बाब पुराव्यांसह  निदर्शनास आणून दिली. यासोबतच मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून दोन वेळा मिसकॉल आला,  फोनवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला नाही, बँक खाते क्रमांक कोणाशीही शेअर केला नाही किंवा ओटीपी क्रमांकही दिला नाही.  तरीही बँक खात्यातून 5 हजार 661 रुपये दोन वेळा कसे ट्रान्सफर केले?  अशी तक्रार चौहान यांनी पोलीस उपायुक्त उल्हासनगर परिमंडळ 4 यांच्याकडे केली असून ऑनलाईन तक्रार सायबर सेलकडे केली आहे.