दुचाकीची नीलगाईला धडक

नीलगाईसह दुचाकीस्वाराचा मृत्यू

शहापूर-किन्हवली मार्गावर उंभ्रई गावाशेजारी एका दुचाकी स्वाराला नीलगाय आडवी आल्याने भीषण अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरदार होती की नीलगाय आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. वेहळोली, चेरवली, कानवे, खरीडच्या जंगलातून उंभ्रई, अस्नोली, मुगावच्या भांग-याचा डोंगर परिसरात विविध जंगली प्राण्यांची अन्नाच्या शोधात ये-जा सुरू असते. त्यामुळे किन्हवली-शहापूर रस्त्यावर परटोली ते बेडीसगाव या दरम्यान रानडुकरे, रानगाई यांना रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.
बेडीसगाव येथे निलगाय कारच्या धडकीत ठार झाल्याची घटना ताजी असतानाच दुपारी उंभ्रई फाट्याजवळ रस्ता ओलांडणा-या निलगाईला भरधाव वेगात जाणाऱ्या  दुचाकीची धडक बसली. या दुर्घटनेत डोळखांब भागातील जांभूळवाड गावातील पंढरी वाघ या २० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून निलगायसुद्धा ठार झाली आहे. किन्हवली पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून स्वतंत्र पंचनामे केले असून मृत पंढरी वाघ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.