घरठाणेचर्चा तर होणारच..., खा. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली मनसे कार्यालयाला भेट

चर्चा तर होणारच…, खा. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली मनसे कार्यालयाला भेट

Subscribe

डोंबिवली : दिवाळीच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाच्यावतीने दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास आलेल्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अचानक डोंबिवली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. याआधी मनसेचे आमदार राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील कलगी तुरा डोंबिवलीकरांनी अनुभवला आहे. पण आता मनसे मध्यवर्ती कार्यालयाला खासदार शिंदे यांनी दिलेल्या भेटीमुळे नवीन राजकीय समीकरणे जुळतायत का? याचीच चर्चा सुरू झाली आहे.

धनत्रयोदशीला मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते. तर त्याआधी शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी राज ठाकरे यांनी ‘मनसे’ साथ दिली होती. शिवाय दरम्यानच्या काळात भाजापा नेत्यांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

गेल्या वर्षीपासून डोंबिवली मनसेच्यावतीने फडके रोडवर नयनरम्य दिव्यांची रोषणाई करण्यात येते. शनिवारी या दीपोत्सवाचे आमदार राजू पाटील यांनी उद्घाटन केले. त्याच रोषणाई केलेल्या फडके रोडवर यंदा शिवसेना शिंदे गटाच्यावतीने रविवारी ‘दिवाळी संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अचानक शेजारीच असलेल्या डोंबिवली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर व शहराध्यक्ष मनोज घरत यांनी खा. शिंदे यांचे स्वागत केले.

शिंदे गट आणि मनसे तसेच श्रीकांत शिंदे व राजू पाटील यांच्यात किती ‘सख्य’ आहे, ते सर्वश्रुत आहेच. डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आणि शिंदे गट यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे सर्वांनी पाहिले होते. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा व मनसे अशी महायुती होणार का? असा सवाल खा. डॉ. शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, बाजूलाच मनसेचे कार्यालय असून शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आग्रह केल्याने आपण मनसेच्या कार्यालयाला भेट दिली. दिवाळीचा सण आहे, एकमेकांना शुभेच्छा देण्याची आपली संस्कृती आहे. जर विरोधक एकत्र आले तर चांगलेच आहे. विरोधात असलो तरी शत्रू नाहीत. त्यामुळे एकमेकांच्या सूचना लक्षात घेऊन काम केले तर, ते अधिक चांगले होईल. तथापि, महायुतीबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे खा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राजू पाटील यांच्याकडून संकेत
शिवसेना-भाजपाशी युती करायची की नाही, हा निर्ण केवळ मनसेप्रमुख राज ठाकरेच घेतील. आता तरी त्यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमची त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. भविष्यात शिवसेना-भाजपा युतीबरोबर जायचे त्यांनी ठरवले तर, आमची त्यालाही तयारी आहे. इथे आमची मने जुळली आहेत, वरून तारा जुळल्या की, सगळे जुळून येईलस हे मात्र निश्चित, असे सांगत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संकेत दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -