Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे मुंबईतील कोकणी चाकरमान्यांची दरवर्षी रेल्वेकडून थट्टा

मुंबईतील कोकणी चाकरमान्यांची दरवर्षी रेल्वेकडून थट्टा

Subscribe

मनसेचे आमदार राजू पाटील यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे तक्रार, गणपतीनिमित्त कोकणात जाणार्‍या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

गौरीगणपती निमित्त मुंबई, ठाणे परिसरातून लाखो भाविक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जात असतात. यावर्षीच्या गौरी गणपती दरम्यानच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे. परंतु तिकिट आरक्षित करुन सुरक्षित प्रवासाचे स्वप्न पाहणार्‍या बंधू भागिनींचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. कोकणात गणपती निमित्त जाणारे बांधव आरक्षित तिकिट मिळावे म्हणून रात्रभर तिकिट रांगेमध्ये उभे असतात. परंतु आरक्षण सुरु झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच गाड्या फूल झाल्याचे दिसून येते. साधे वेटिंगमधील तिकिटही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालय कोणतीही भूमिका जाहिर करीत नाही, तसेच प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न करीत नाही. वर्षानुवर्षे केवळ गृहित धरण्याचा प्रयत्न करीत असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून याविषयी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

गौरी गणपतीसाठी कोकणात जाणार्‍या रेल्वेगाड्यांविषयी दरवर्षी अशीच परिस्थिती उद्धभत असते. रेल्वे मंत्रालय मात्र यावर कोणताही तोडगा काढत नाही. दलालांच्या हातात रेल्वेचे सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रासपणे तिकिट बूक होत असल्याची तक्रार रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. असे असतानाही रेल्वे मंत्रालयाला कोणतेही गांभिर्य नाही. एवढी वाईट परिस्थिती असताना साधी चौकशीही होत नसल्यामुळे दलालांना संधी मिळते. वर्षानुवर्षे त्याची झळ कोकणातील बांधवांना सहन करावी लागत आहे. तरी आपण तातडीने लक्ष घालून सर्व गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घ्यावा. नवीन गाड्यांचे नियोजन आताच करुन गौरीगणपती निमित्त जाणार्‍या सर्व भाविकांना आरक्षित तिकीट मिळून सुखकर प्रवास होईल याची काळजी घ्यावी, अशी विनंती आमदार राजू पाटील यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -