घरठाणेवाहतुकीसाठी ७ आणि २१ मार्चला मुंब्रा बायपास बंद; 'या' मार्गाने करा प्रवास

वाहतुकीसाठी ७ आणि २१ मार्चला मुंब्रा बायपास बंद; ‘या’ मार्गाने करा प्रवास

Subscribe

या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार

मुंब्रा बायपास हा विवार ७ मार्च आणि रविवार २१ मार्च रोजी या दोन दिवशी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे- दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून मुंब्रा बायपास मार्गावर लोखंडी रेल्वेपूल उभारणीचे काम दोन दिवस करण्यात येणार आहे. या दिवशी मुंब्रा बायपास हा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

असा असेल पर्यायी मार्ग

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीटीकडून मुंब्रा बायपासमार्गे नाशिक, भिवंडी व ठाणे ग्रामीणकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल, न्हावडे फाटा, तळोजे, एमआयडीसी, उसाटणे, खोणी, नेवाळी मार्गे, कल्याणमधून दुर्गाडीमार्गे भिवंडीकडे सोडण्यात येणार आहे. तर नाशिकडे जाणाऱ्या वाहनांना आधारावाडी जेल, बांपगांव, पडघा नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गाने नाशिकला जाता येईल. तर ठाण्यातून जाण्यासाठी कल्याणफाटा, शिळफाटा येथून महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने माजीवड्यामार्गे जाता येईल. गुजरात, पालघर येथून घोडबंदरमार्गे येणाऱ्या वाहनांना घोडबंदर रोडवरून ऐरोलीमार्गे नवी मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. तर नाशिकडून येणाऱ्या वाहनांनाही कल्याणमार्गे नवी मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंब्रा शहरातून ठाणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी…

मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद असल्याने मुंब्रा शहरातून ठाणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा, उजवीकडे वळण घेऊन महापे रोड, रबाळे, ऐरोली मार्गे मुंबईकडे जाता येणार आहे. तसेच पुढे दिवा, विटावा, कळवा खाडी ब्रिज मार्गे ठाण्याकडेही जाणारा पर्यायी मार्ग असणार आहे.

गेल्या ८ ते १० वर्षापासून सुरू असलेले ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असून सध्या ते अंतिम टप्प्यात आहे. मुंब्रा बोगद्यातून रेल्वे रूळ खाडीवरील उन्नत रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ अर्थात मुंब्रा बायपास रस्त्यावर लोखंडी रेल्वे पुलाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. या पुलाच्या जोडणीकरता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. यासाठीच ठाणे पोलिसांशी संपर्क साधून दोन रविवार निवडण्यात आले आहे. या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून ते ऱविवारी मध्यरात्रीपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -