व्हायरल झालेल्या पत्राने उडवली मुंब्रा पोलिसांची झोप

30 कोटींच्या धाडीत 6 कोटींची वसुली?

सचिन वाझे, प्रदीप शर्मा, परमवीर सिंह यांच्या खंडणी वसुलीच्या कथा अद्याप शांत होत नाहीत तोच पुन्हा एकदा राज्यातील पोलीस अधिकारी खंडणी वसुलीसाठी कोणकोणते प्रताप करीत आहेत याचे धक्कादायक वास्तव एका व्हायरल झालेल्या पत्राने पुढे आले आहे. या व्हायरल झालेल्या पत्राची सत्यता पोलीस शोधून काढत आहेत, मात्र त्यामुळे ठाणे पोलिसांच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

व्हायरल झालेल्या पत्रातील तक्रारदाराने ठाणे पोलीस आयुक्त जगजीत सिंग तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पाठवलेल्या लेखी पत्रानुसार दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी रात्री बारा ते साडेबारादरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे भूमी निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक मदने आणि आणखी तीन खासगी व्यक्ती पोलीस गाडीने मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमधील फैजल मेमन यांच्या घरी रेड टाकण्यासाठी गेले. पोलिसांनी घातलेल्या धाडीमध्ये मेमन यांच्या घरात ३० कोटी रुपयांची रोकड सापडली. प्रत्येकी १ कोटीप्रमाणे 30 बॉक्समध्ये हे ३० कोटी रुपये बांधून ठेवण्यात आले होते. एवढी मोठी रोकड घरात सापडल्यामुळे हा काळा पैसा असून तुझ्यावर धाड पडेल आणि सर्व पैसा जप्त होईल, अशी भीती उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी मेमन यांना दाखवली. त्यानंतर हे सर्व पैसे जप्त करून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे नेले.

मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये 30 कोटींचे हे 30 बॉक्स ठेवण्यात आले होते. तिथे मेमन यांना घेऊन गेल्यानंतर मात्र पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलिसांच्या दबावाला घाबरल्याने मेमन २ कोटी रुपये देण्यास तयार झाले. यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी आम्ही २ कोटी यातून काढून घेतो आणि उरलेले तुला परत करतो, असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात ३० कोटींमधून २ कोटींऐवजी त्यामधून ६कोटी रुपये काढून घेतले आणि उरलेले 24 कोटी रुपये मेमन यांना परत केले. एवढे पैसे का घेतले, असे मेमन यांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधिकार्‍यांनी लाथा मारून त्यांना बाहेर काढले, असेदेखील या व्हायरल पत्रात म्हटले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार
याबाबत ठाणे पोलिसांनी चौकशीची कारवाई सुरू केली असून मुंब्रा पोलीस स्टेशनमधील १२ एप्रिल २०२२ रोजीचे मध्यरात्री बारा ते साडेबारादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. पोलीस ठाण्यामधील सीसीटीव्ही फुटेज हे एका वर्षापर्यंत सेव्ह करून ठेवावे लागते. जर काही असा प्रकार घडला असेल आणि तो वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात घडला असेल तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल आणि या घटनेची सत्यता पडताळून पाहिली जाईल, असे आता ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत, मात्र एकूण परिस्थिती पाहता ठाणे पोलीस आयुक्तालयामधील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असून सीसीटीव्हीचे फुटेज नष्ट करण्यात आले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पोलीस निरीक्षक शेवाळे रजेवर?
या सर्व प्रकरणात प्रमुख आरोपीच्या पिंजर्‍यात असलेले मुंब्रा पोलीस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षक शेवाळे हे प्रकरण घडल्यापासून आजारपणाच्या रजेवर गेले असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या सर्व प्रकरणाबाबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कराळे तसेच विभागीय पोलीस उपायुक्त अंबुरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली जात असून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल, असे सांगितले.

कोण आहे फैजल मेमन?
मुंब्रा बॉम्बे कॉलनी येथील घरावर धाड टाकण्यात आलेले फैजल मेमन हे मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचे व्यापारी आहेत. तसेच ते भागीदारीमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहेत, असे सांगण्यात आले. धाडीत त्यांच्या घरी पोलिसांना आढळलेल्या ३० कोटींपैकी 20 कोटी रुपये त्यांना चेकने आले होते. उर्वरित 10 कोटी अन्य मार्गाने आले होते, असेही सांगण्यात येते.