यापुढे बेकायदा बांधकामांना पालिकेचा पाणी पुरवठा नाही  

पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा निर्णय

कल्याण डोंबिवली महापालिकाच काय परंतु राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनधिकृत बांधकामांना सर्रासपणे मालमत्ता कर लावला जातो आणि पाणी पुरवठा जोडणीही केली जाते, कारण मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा हा दोन्ही बाबी या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नाचे साधन समजले जाते. परंतु आता कल्याण डोंबिवली महापालिका या अनधिकृत उत्पन्नावर पाणी सोडणार असून पालिका क्षेत्रात भविष्यात निर्माण होणार्‍या अनधिकृत बांधकामांना पाणी जोडणी दिली जाणार नसल्याचा  धाडसी  निर्णय कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला.

गेल्या वर्षीच्या माहे ऑक्टोबर २१ पासून कल्याण-डोंबिवली परिसरातील ४४२ अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याची धडक कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केली. याच अनषंगाने भविष्यात अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण ४१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा प्रती दिन वितरीत केला जातो. यापैकी ३६० द.ल.लि पाणीपुरवठा, महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून आणि ५५ द.ल.लि पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असूनही काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका परिसरातील अनधिकृत चाळी आणि अनधिकृत इमारतीतील नळ कनेक्शन्स  शोधून खंडित करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.

या निर्देशानुसार माहे ऑक्टोबर २१ ते आजपर्यंत डोंबिवी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण यांच्या पथकाने डोंबिवली परिसरातील ३६३  अनधिकृत इमारती आणि अनधिकृत चाळींमधील नळ कनेक्शन शोधले. त्याच प्रमाणे कल्याण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे  यांच्या पथकाने कल्याण परिसरातील ७९ अनधिकृत इमारती, चाळींमधील नळ कनेक्शन शोधून ते खंडित केले आहेत. यापुढेही या कारवाया सुरूच असून त्या आणखी तीव्रतेने राबवल्या जाणार आहेत.  त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.