नवा जलकुंभ बांधण्याचा महापालिकेचा निर्णय

स्ट्रक्चरल ऑडिटनंतर समजणार पडझडीचे कारण

तब्बल ३७ वर्ष जुना असलेला सावरकर नगर येथील जलकुंभाच्या टॉपचा स्लॅब पडल्याची घटना बुधवारी समोर आली. त्यानंतर महापालिकेने त्याच्या बाजूला नवा जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या जलकुंभाची क्षमता ही जुन्या जलकुंभापेक्षा १ एमएलने जास्त आहे. तसेच जुन्या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पडझडीचे काम पुढे येईल. तर स्लॅब पडल्याने पाणी पुरवठा फारसा परिमाण होणार नाही. तसेच शहरातील इतर ३५ वर्ष जुने झालेले १५ जलकुंभांपैकी बहुतांश जलकुंभाची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून जे दुरुस्त करण्याचे राहिले असतील त्यांचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सावरकर नगर भागात १९८५ साली उभारलेला ठाणे महापालिकेच्या जलकुंभाच्या टॉपचा स्लॅब पडल्याची घटना बुधवारी घडली होती. त्यांनतर तातडीने या जलकुंभाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या जलकुंभाच्या माध्यमातून किसन नगर, सावरकर नगर, इंदिरानगर आदींसह सात भागांना पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन ते चार वर्षापासून या जलकुंभाच्या वरील स्लॅब हा कमकुवत झाला होता. यासंदर्भात येथील कामगारांनी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्याकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या जलकुंभ मधुन होणारा पाणीपुरवठा तपासण्यासाठी असलेले इंडिकेटर बंद होते, त्यामुळे त्यामुळे पाणी किती येते किती जाते हे समजू शकत नव्हते त्यामुळे पाण्याची पातळी तपासण्यासाठी कामगार गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

या जलकुंभाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले असून जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत याचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर जलकुंभाच्या पडझडीचे कारण समजू शकणार आहे. मात्र या जलकुंभाच्या दुरुस्ती बरोबरच बाजूलाच ठाणे महापालिकेचे आरक्षण असलेल्या जागेमध्ये नवीन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ३ एमएल क्षमता या जलकुंभाची असणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आधीचचा पाणीपुरवठा या माध्यमातून करणे शक्य होणार आहे.