घरठाणेमहापालिका निवडणुकांचा महासंग्राम मार्चमध्ये ?

महापालिका निवडणुकांचा महासंग्राम मार्चमध्ये ?

Subscribe

तिसरी लाट ओसरताच बिगुल वाजणार !

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील मुदत संपलेल्या कल्याण महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नवीन वर्ष २०२२ च्या प्रारंभी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असल्याने पुन्हा एकदा निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग देखील राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कोरोनाची लाट ओसरल्यावर मार्च महिन्यात घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांची मुदत यापूर्वीच संपली असून तेथे प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड,नागपूर, नाशिक, उल्हासनगर, अमरावती, सोलापूर आणि अकोला या महापालिकांची मुदत संपणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे दुसऱ्या लाटेनंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १५ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे.  फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेतल्या जातील, अशीच चर्चा होती. दरम्यानच्या काळात ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेवू नयेत, अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे. त्या अनुषंगाने विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांनी तसा प्रस्ताव एकमताने मंजूर करून तो निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.

मात्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरुच ठेवली आहे. सर्व महापालिकांच्या निवडणुका पॅनेल पद्धतीने होणार असून त्री सदस्यीय प्रभाग रचना अतित्वात येणार आहेत. त्यानुसार महापालिकांनी प्रभाग रचनेचे प्रारूप आराखडे राज्य निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. आता केवळ आरक्षण निश्चिती करणे शिल्लक आहे.
एकीकडे कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या व्हिडीओ कॉन्फरसद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत  निवडणुकीच्या तयारीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला  आहे. परदेशात कोरोनाची तिसरी लाट सहा आठवडेच होती. आपल्याकडे ही लाट पुढच्या तीन आठवड्यात संपणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे तिसरी लाट ओसरताच राज्य निवडणुक आयोगाकडून अचानक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  तिसरी लाट ओसरताच निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३० दिवसांचा कालावधी पुरेसा असल्याचे म्हटले जाते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व मागे घेण्यासाठी ५ दिवस, प्रचारासाठी ५ ते ७  दिवस तसेच मतदान आणि मतमोजणीसाठी २ दिवस अशाप्रकारे १२ ते १४ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -