कळव्यातील गरीब रहिवाशांचा जीव टांगणीला!

धोकादायक इमारतीतील 183 रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जुन्या इमारतीचे स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत असून नुकताच दोन दिवसापूर्वी कळवा परिसरात एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पावसाळ्यात खबरदारी म्हणून पालिकेने कळवा परिसरातील सुमारे 183 धोकादायक इमारतींना नोटिसा दिल्या. त्यामध्ये राहणार्‍या आणि पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील बेकादा झोपड्यांत राहणार्‍या हजारो रहिवासीयांचा मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे जीव टांगणीला लागला आहे.

कळवा विटावा व खारेगाव परिसरातील 183 इमारती या सध्या धोकादायक स्थितीत आहेत. यामध्ये काही अतिधोकादायक आहेत. घोलाई नगर परिसरातील डोंगर पायथ्याशी असलेल्या 40 झोपड्या रिकाम्या करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या इमारत, झोपड्यामध्ये राहणार्‍या हजारो रहिवाशांना कुठे राहावे याची चिंता लागली आहे. यामधील बहुतांश इमारतींना तडा गेले आहेत. यामध्ये 5 इमारती अतिधोकादायक आहेत, त्या तोडल्या जात आहेत.

तसेच देवकीनंदन या धोकादायक इमारतीचे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे. तर 178 इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे. कळवा,विटावा, खारिगावात अनेक इमारती त्यावेळी मिळेल त्या जागेत बांधण्यात आल्या. त्यातील दोन मजली इमारती त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे दलालांनी हाऊसिंग सोसायटी नोंदणी करून दिल्या. परंतु पालिकेने कोणत्याही प्रकारचे ‘स्ट्रक्चर ऑडिट’ न केल्याने आता या इमारतींचे आयुष्य संपुष्टात आले आहे. त्यातच कळवा खारेगावात सध्या नवीन घरांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने त्या सर्वसामान्य लोकांच्या आवक्या बाहेरच्या आहेत.

बेघर व्हावे का मरणाच्या सावटाखाली रहावे?
कळव्यात 11 वर्षापूर्वी सोनुबाई निवास, अन्नपूर्णा या धोकादायक इमारती कोसळून 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.तर गेल्या वर्षी घोळाईनगर मध्ये झोपडीवर दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाही पालिका प्रशासन यावर ठोस उपाययोजना करीत नसल्याने हे रहिवासी पावसतही आपला जीव धोक्यात घालून दिवस पुढे ढकलत आहेत.

दरड क्षेत्रात वनविभागाची किरकोळ कारवाई
पारसिक डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या हद्दीत भूमाफियांनी हजारो बेकायदा झोपड्या बांधल्या आहेत. मात्र वनविभाग दरवर्षी वरचेवर कारवाई करत असल्याने येथे झोपड्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे दरड कोसळून येथे येथील नागरिकांचे बळी जातात.

कळव्यातील 75 टक्के इमारती ओसीच्या कचाट्यात
कळवा विटावा परिसरात गेल्या 30 ते 35 वर्षांत अनेक बेकायदा, अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत त्यातील अनेक इमारतींचे बांधकाम विकासकांनी नित्कृष्ट दर्जाचे केले आहे. ओसी न मिळाल्याने जवळपास 75 टक्के इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र तयार न मिळाल्याने संबधीत इमारतींची माहिती शहर विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या इमारती अती धोकदायक झाल्याने अथवा इमारत कोसळल्यांतर खाली करताना त्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने या रहिवासीयांना रेंटल इमारतीमध्ये स्थलांतर करताना अनेक अडचणी येतात. तसेच या पुन्हा इमारती बांधकाम करताना विकासक या रहिवाशांची अडवणूक करीत असतात त्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य धोकादायक ठरते.

मालक भाडेकरू वाद
या धोकादायक इमारतींमध्ये बहुतांश इमारती या ग्रामपंचायत कार्यकाळात बांधल्या असल्याने त्या 1966 च्या भाडे नियंत्रण कायद्याच्या चौकटीत येत असल्याने या इमारतीचे मालक व भाडेकरू यांचे वाद सुरू आहेत.
सध्या कळवा खारेगाव व विटावा परिसरातील 183 धोकादायक इमारती मधील हजारो नागरिकांचे जीव टांगणीला लागले आहेत.

” पावसाचे दिवस असल्याने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अतिधोकादायक इमारती तोडण्याचे काम सुरू आहे. तर दरड क्षेत्रातील बेकायदा झोपड्यांना नोटीसा देऊन खाली केल्या आहेत.”
– समीर जाधव,सहा. आयुक्त कळवा प्रभाग समिती

मागील गेल्या 30 वर्षांपासून आम्ही या जुन्या इमारतीमध्ये राहतो. इमारत धोकादायक झाली आहे. परंतु माझी मुले अजून शिकत आहेत. घरांच्या किंमती प्रचंड वाढल्यात भाडेही वाढले आहे. त्यातच महापालिका घर देण्याची हमी देत नसल्याने जीव मुठीत धरून आम्ही या इमारतीमध्ये राहतो”
– फुलाबाई कांबळे, धोकादायक इमारतीमधील रहिवासी