पालिका अधिकारी, कर्मचा-यांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी काम करावे

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आवाहन

Bhiwandi-Mahanagar-Palika
भिवंडी महानगरपालिका

स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 अंतर्गत शहरातील स्वच्छता आणि इतर विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी 9 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या तिस-या मजल्यावरील काॅन्फरन्स हाॅलमध्ये भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुख्यालय उपायुक्त दिपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) प्रिती गाडे यांच्यासह बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता, आरोग्य अधिकारी, शहर समन्वयक आणि शौचालय अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी भिवंडी शहराला या पूर्वी दोन वेळेस स्वच्छ सर्वेक्षणात 10 ते 15 लाख लोकसंख्या गटात चांगले मानांकन मिळाले आहे. यापुढेही हे मानांकन टिकवण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे सूचित केले. पदाधिकारी, नगरसेवक, सुजाण नागरिक, मनपा अधिकरी आणि कर्मचारी यांनी चांगले काम यापुढेही करावे आणि शहर स्वच्छ, सुंदर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वर्ष 2021 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण पथक भिवंडी शहरात कोणत्याही ठिकाणी पाहाणीसाठी येईल. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावर आणि कचरा कुंडीजवळ पडलेले बांधकाम साहित्यांचे वर्गीकरण करणे, याबाबत नियोजन करणे, तसेच शहरातील सार्वजनिक शौचालये, मच्छीमार्केट यांची नियमित स्वच्छता करणे, स्वच्छ सर्वेक्षणातील सात प्रश्नांची माहिती देणे, त्याचा प्रसार करणे, प्लास्टिक निर्मूलन पथकाद्वारे प्लास्टिक वापर करणा-या आस्थापनांवर कारवाई करणे, शहरातील सर्व रस्ते स्वच्छ करणे, नागरिकांच्या आरोग्याविषयातील कामांना प्राधान्य देणे, नागरिकांच्या तक्रारी दूर करणे, स्वच्छता अॅपचा प्रभावी वापर करणे, नागरिकांच्या तक्रारी स्वच्छता अॅपद्वारे सोडवणे, याच बरोबर शहरातील कचरा कुंड्या बंद करणे, त्या ठिकाणी सुशोभिकरण करणे, उद्यानात खड्डे करून खत निर्मिती प्रकल्प तयार करणे, तयार झालेल्या खताची विक्री करणे, कचरावेचकांचे शिबिर घेणे, सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत अत्यावश्यक सूचना रंगवून घेणे, सार्वजनिक शौचालय निगा आणि दुरुस्ती करणे, शहरातील महत्वाचे चौक रस्ते येथील भिंती रंगवून सामाजिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, तसेच हे सर्व करत असताना कोरोनाबाबतही मार्गदर्शन आणि सूचना, नियमांचे तंतोतंत पालन करून शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित विभागांना दिले.