तब्बल २० वर्षानंतर सापडला खुनाचा आरोपी; पाच हजाराची सुपारी घेऊन केली होती हत्या

The kidnapper was arrested

पाच हजार रुपयांची सुपारी घेऊन २० वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या घेऊन फरार झालेल्या दोन सुपारीबाजांपैकी एकाला काल, गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरात राज्यातील मेहसाना जिल्ह्यातून अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा ताबा ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांना देण्यात आला आहे.

शंभू मनुभाई रावल (वय ४६) असे २० वर्षानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दुसरा आरोपी सुरेश मनिलाल नाव्ही याचा २०१५ मध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक १ पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रक सरक यांनी दिली. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रघुनाथ नगर येथे राहणारी कुंदा कुंदन रावल (वय ३५) या महिलेची १८ फेब्रुवारी २००० मध्ये डोक्यात फरशी टाकून हत्या करण्यात आली होती. या महिलेच्या हत्येची पाच हजार रुपयाची सुपारी तिचा पती कुंदन रावल याने शम्भू रावल आणि सुरेश नाव्ही यांना दिली होती. दरम्यान, वागळे इस्टेट पोलिसांनी हत्याच गुन्हा दाखल करून पती कुंदन रावल याला अटक केली होती. मात्र सुपारी घेऊन हत्या करणारे शम्भू आणि सुरेश हे दोघे फरार झाले होते, यादोघांचा शोध घेऊनही दोघे पोलिसांच्या हाती लागत नव्हते.

दरम्यान, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक १ कडून फरार आरोपीचा शोध घेण्याची मोहीम सुरु असताना कुंदा रावल हिच्या हत्येतील फरार दोन आरोपी गुजरात राज्यातील मेहसाना जिल्हा तालुका विजापूर मु. पो. गवाडा येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक १ चे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. समीर अहिरराव, पोउनि दत्तात्रय सरक, पो. हवा. संभाजी मोरे, प्रकाश कदम, सुनील माने, दादासाहेब पाटील, राहुल पवार आणि भगवान हिवरे या पथकाने मेहसाना जिल्ह्यातील गवाडा येथे माहिती काढून शम्भू रावल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सुरेश नाव्ही याच्याबाबत चौकशी केली असता सुरेशचा २०१५ मध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शंभू रावला अटक करून गुरुवारी ठाण्यात आणून त्याचा ताबा वागळे इस्टेट पोलिसांकडे पुढील तपासासाठी देण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा –

घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठा निर्णय; महिलांना लोकलने प्रवासाची मुभा!