ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटात सावळा गोंधळ

नरेश मस्के म्हणतात मीच ठाणे जिल्हाप्रमुख..तर कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा राजीनामा

नरेश म्हस्के

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्यापासून त्याचे मोठे पडसाद ठाणे जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. एकीकडे मूळ शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख वेगवेगळी भूमिका घेत असल्यामुळे शिंदे समर्थकांमध्येही गोंधळाचे वातावरण आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख व ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांची जिल्हाप्रमुख पदावरून काही दिवसांपूर्वीच हकालपट्टी केली होती. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी आज मीच ठाणे लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे असे घोषित करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयालाच उघड आव्हान दिले आहे.

तर दुसरीकडे मूळ शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी काल रात्री उशिरा शिवसेनेच्या कल्याण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे तसेच ते शिंदे गटात सामील होत असल्याचे जाहीर केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि शिंदे गटांमध्ये अधिकच संभ्रम वाढला आहे. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेले ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश मस्के हे अद्यापही तेच शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असल्याचे सांगत आहेत.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत शिंदे गटाला समर्थन जाहीर केल्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. नरेश मस्के सर हकालपट्टी नंतरही ते जिल्हाप्रमुख असल्याचे सांगत असतील तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी न केलेले कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी राजीनामा का दिला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. निष्ठावंत शिवसैनिक आणि शिंदे गटाचे समर्थक यांच्यात देखील संघटनात्मक पदांवरून मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण होत असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात आहे.