Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफला हंगामी नोकरी

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफला हंगामी नोकरी

९ जून रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयात बाल शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ राष्ट्रीय पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचा इशाराही दिला होता.

Related Story

- Advertisement -

शहापूर तालुक्यातील शौर्य पुरस्कार मिळालेल्या हाली बरफ या महिलेचे आणि तिच्या कुटुंबाचे लाॅकडाऊन काळात उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे हाल सुरू होते. हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत मिळालेली नोकरी आश्रमशाळा बंद असल्याने बंद झाली. तर शिधावाटप पत्रिकेची ऑनलाईन नोंद नसल्याने तीन महिने धान्यही मिळाले नसल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली. या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्याने त्याची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर हाली हिची नियुक्ती केली.बुधवारी हली बरफला भिवंडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावून नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला. त्या सोबतच पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधा पत्रिकेची ऑनलाईन नोंदणी होत नाही.

तोपर्यंत तिला ऑफलाईन धान्य देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिले आहेत. हालीची व्यथा समजताच खासदार कपिल पाटील यांनी कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने २१ हजार रुपयांची मदत केली. तर खासदार पाटील यांचेच स्वीय सहायक राम माळी यांनी महिनाभराचे किराणा सामान दिले होते. कातकरी आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील हाली बरफ हिने १२ वर्षांची असताना जंगलात लाकूडफाटा घेण्यासाठी गेली असता वाघाने केलेल्या हल्ल्यातून मोठ्या धाडसातून आपल्या बहिणीचे प्राण वाचविले होते. त्याचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन करण्यात आला होता. परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हाली कडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले. त्यातून तिला अंत्योदय शिधापत्रिका , घरकुल देण्यात आले.

- Advertisement -

तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळा मागील एक वर्षांपासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती. त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा गरीबीचे जीवन जगण्याची वेळ आली होती. यावर उपाय म्हणून ही तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हाली बरफ हिने समाधान व्यक्त केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून हाली बरफ हिच्या वाट्याला आलेल्या आयुष्याची माहिती कळताच आपण तिला हंगामी नोकरी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे. श्रमजीवी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना हालीच्या परिस्थितीविषयी पत्र लिहून माहिती दिली होती. तसेच येत्या ९ जून रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयात बाल शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ राष्ट्रीय पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचा इशाराही दिला होता.

- Advertisement -