ठाण्यात राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा, चंपाकली मुर्दाबादच्या घोषणा

ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही. संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या नाहीतर मसणात जा, अशी टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला. यावेळी चंपाकली मुर्दाबाद अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

 काहीही बरळत आहेत

बुधवारी राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना, खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा मसणात जा; पण, आरक्षण द्या , अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याविरोधात गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंपाकली हाय हाय, चंद्रकांत पाटील मुर्दाबाद, आरक्षणासह निवडणूक झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा दिल्या. सर्वात जास्त वेळा संसदरत्न बहुमानाने सुप्रिया यांना सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही. संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. तर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला कुंकू, नथीचे चित्र काढून त्यास जोडे मारले. यावेळी चंद्रकांत पाटील यांचा पुतळाही जाळण्यात आला.

मानसिक संतुलन ढासळत चालले
याप्रसंगी आनंद परांजपे म्हणाले की, हा महाराष्ट्र जिजाऊ, अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांचा आहे. त्यांचा वारसा अतिशय सक्षमपणे सुप्रियाताई चालवित आहेत. याची जाण तमाम महाराष्ट्राला आहे. तरीही, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताई यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला देऊन देशातील तमाम मायभगिनींचा अवमान केला आहे. 21 व्या शतकात देशातील महिलांनी चूल मूल ही संकल्पनाच मोडीत काढून सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्या महिलांना पुन्हा चूलमूल या संकल्पनेत अडकाविण्याची चंद्रकांत पाटील यांची मनुवादी विचारसरणी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली आहे. “शूद्र, पशू और नारी; सब है ताडण के अधिकारी” अशी मानसिकता भाजपची आहे. त्याच मानसिकतेतून चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबाबतीत हे विधान केले आहे. यातून चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे, हे स्पष्ट झाले आहे. म्हणून त्यांना ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवा. त्यांच्यासाठी आम्ही एक बेड आरक्षित करीत आहोत. तसेच ते ठाण्यात आल्यावर त्यांना साडीची देऊ, अशी टीकाही परांजपे यांनी केली.

या आंदोलनात युवक अध्यक्ष विक्रम खामकर,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, हाॅकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, असंघटीत सेलचे राजू चापले, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रभाकर सावंत, मिलिंद बनकर,अजित सावंत, शिवा कालुसिंग, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, निलेश कदम, रत्नेश दुबे, प्रदीप झाला, वाॅर्ड अध्यक्ष संतोष घोणे, साई प्रभु, राजेंद्र कदम, देवेंद्र येनपुरे, हरिश्चंद्र गुरव, अनिल भोसले, रवींद्र धुळगुडे, इक्बाल शेख, राहुल काळे, महिला पदाधिकारी शशिकला पुजारी, ज्योती निंबर्गी, फुलबानो पटेल, माधुरी सोनार, स्मिता पारकर, पूनम वालिया, सुरेखा शिंदे, हाजी बेगम शेख, वंदना हुंडारे, सुवर्णा खिल्लारे युवक पदाधिकारी अभिषेक पुसाळकर, संतोष मोरे, राजेश कदम, निलेश जाधव, श्रावण भोसले, भारत पवार आदी सहभागी झाले होते.