हे तर भांडवलदारांचे केंद्र सरकार

नवी मुंबईत राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांचा घणाघात

देशातील शेतकरी आणि कामगारांना बाजूला फेकून भांडवलदार कंपन्यांना सोबत घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची वाटचाल सुरु आहे. चुकीचा कायदा आणून हे सरकार देशातील शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावतील, असा घणाघात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी मंगळवारी वाशी येथे बोलताना केला. आम्ही अन्नदात्या बळीराजासोबत आहोत, अशी भूमिका नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांनी यावेळी मांडली.

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन करीत शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी दोन्ही काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी उपस्थित राहून भाजप सरकारचा जाहीर निषेध केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई मनपाचे नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई घाडगे, काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा उज्वलाताई साळवे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष सौरभ काळे, बेलापूर विधानसभा अध्यक्ष जतीन धनावडे, वाशी तालुकाध्यक्ष सतनाम नागपाल, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा श्वेता खरात, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्वच जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी उपस्थितीत होते. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले. बंदला मंगळवारी पहाटेपासूनच सुरुवात झाली. पनवेलमध्ये महाविकास आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.

यावेळी पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या दिवंगत दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, कार्याध्यक्ष बाळाराम पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष महेंद्र घरत, प्रमुख सल्लागार खा.श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, खासदार सुनील तटकरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, विवेकानंद पाटील, मनोहर घरत, आर.सी.घरत, उपाध्यक्ष सतीश पाटील, दिनेश पाटील, भूषण पाटील, काशिनाथ पाटील, खजिनदार शिरीष पाटील, सचिव सुदाम पाटील, सहसचिव गणेश कडू, अनिल नाईक आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भारत बंदसाठी आवाहन केले.