घरठाणेमराठी भाषेला लागलेले अमराठी वळण थांबवण्याची गरज!

मराठी भाषेला लागलेले अमराठी वळण थांबवण्याची गरज!

Subscribe

'कोमसाप'च्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजय कुवळेकर यांचे प्रतिपादन

मॉरिशस (आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन, दिवस पहिला, २ डिसेंबर २०२३) :
मराठी भाषा जतन करायची जबाबदारी केवळ सरकारची नसून ती आपल्या सगळ्यांची आहे. सध्या मराठी भाषेत बरेच अमराठी शब्द घुसले आहेत. मराठीला लागलेले हे अमराठी वळण थांबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक-लेखक विजय कुवळेकर यांनी मॉरिशस येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात केले.

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’ आणि मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन मॉरिशस येथे २ ते ३ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.

- Advertisement -

या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार-लेखक विजय कुवळेकर असून संमेलनाचे उद्घाटन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी मॉरिशसमधील भारतीय दुतावासाच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री ॲलन गानू, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बाप्पू, स्वागताध्यक्ष निशा हिरू, संमेलनाचे निमंत्रक आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते. कोमसापतर्फे परदेशात पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन होत असून यासाठी राज्यातून १०० हून अधिक साहित्यिक व कलावंत मॉरिशस येथे उपस्थित आहेत. शनिवारी सकाळी मॉरिशसमधील हिंदी विश्व विद्यालयाच्या संमेलन परिसरात काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीत महाराष्ट्रातील साहित्यिक-कलावंत व मॉरिशसमधील मराठी मंडळी मराठमोळ्या पेहरावात मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. यावेळी टाळ-मृदुंगासह ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने येथील परिसर दुमदुमून गेला. या ग्रंथदिंडीत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नाटककार अशोक समेळ, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, माध्यम सल्लागार जयू भाटकर, लेखिका उषा परब, रायगड कोमसापचे सुधीर शेठ, सिंधुदुर्ग कोमसापचे मंगेश म्हस्के, प्रा. दीपा ठाणेकर, कवयित्री नीतल वढावकर, कवी जनार्दन पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते. दिंडीनंतर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर झालेल्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर यांनी आपली अध्यक्षीय भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, १९९१ नंतर दुसऱ्यांदा मॉरिशसमध्ये मराठी भाषकांचे साहित्य संमेलन होत असून मॉरिशसचे कोकणाशी नाते पूर्वजांपासून जोडलेले आहे. आताच्या काळात मराठी भाषेत कालानुरूप अनेक इंग्रजी व अन्य भाषांतील शब्द घुसले आहेत. भाषेत काळानुरूप बदल जरूर व्हावेत, परंतु हे बदल होत असताना मूळ भाषेचे सत्त्व तर गमावले जात नाही ना, हेदेखील पाहणे आवश्यक आहे, असे मत संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

- Advertisement -

यावेळी मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बाप्पू यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, साधारण १८८० च्या दशकात रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रातील-कोकणातील अनेक लोक मॉरिशसला आले. त्यानंतर त्यांच्या पुढील पिढ्यादेखील येथेच स्थायिक झाल्या. आता त्यांची पाचवी पिढी मॉरिशसमध्ये राहत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी ही पिढी कार्यरत असून आपले पूर्वज महाराष्ट्रातील आहेत याचा त्यांना अभिमान आहे. मराठी संस्कृती व भाषेच्या जतनासाठी ही मंडळी कार्यरत आहेत, असा विश्वास नितीन बाप्पू यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मराठी भाषेला मॉरिशसमधील अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली असून भाषा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर आपला आनंद व्यक्त करताना याप्रसंगी म्हणाल्या की, मॉरिशस आणि महाराष्ट्र यांच्या ऋणानुबंधाच्या वाटचालीतील मॉरिशसमध्ये होत असलेले हे संमेलन म्हणजे ऐतिहासिक क्षण आहे. तसेच या संमेलनामुळे मॉरिशसमधील मराठी भाषक आणि महाराष्ट्रातील मराठी साहित्यप्रेमी यांच्यातील जन्मजन्मांतरीचे नाते दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले, तर आभार राहुल निळे यांनी मानले. कोमसापचे सदस्य व मॉरिशसमधील मराठी मंडळींनी यावेळी महाराष्ट्राची परंपरा दाखवणारे सांस्कृतिक कार्यक्रम संमेलनाच्या पहिल्या दिवशी सादर केले. यावेळी दुपारच्या सत्रात ‘मराठी भाषेचे जतन : देशात व परदेशात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे अध्यक्ष विजय कुवळेकर होते, तर यावेळी वक्ते म्हणून डॉ. विनय सहस्रबुद्धे, वृषाली मगदूम, उषा परब, निशा हिरू, भालचंद्र गोविंद, किरून नाओजी मोईबीर आदींनी आपली भूमिका मांडली. या परिसंवादाचे सूत्रसंचालन जयू भाटकर यांनी केले. पहिल्या दिवशी शेवटचे सत्र कवी संमेलनाचे होते. त्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते. कवी संमेलनात महाराष्ट्र व मॉरिशसमधील २५ हून अधिक कवींनी कविता सादर केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -