राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश भोवणार

भिवंडी महापालिकेच्या १८ नगरसेवकांना नोटीसा, ५ जानेवारीला हजर राहण्याचे कोकण आयुक्तांनी दिले आदेश

bhiwandi - Nijampur municipal corporation

नगरसेवक पद वाचवण्यासाठी भिवंडी महापालिकेचा १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या बंडखोरी करणार्‍या १८ नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा १८ नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून पक्षाशी दगाबाजी करून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला. त्यामुळे १८ फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केल्यामुळे या नगरसेवकांना कार्यालयात बोलावून आयुक्तांनी सुनावणी द्वारे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सर्व कागदपत्रांची तपासणी पूर्तता करून ५ जानेवारी रोजी हजर रहावे, असे आदेश नगरसेवकांना कोकण आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी दिल्यामुळे नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे. पालिकेचा महापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा १८ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाचा उमेदवारास मतदान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणार्‍या १८ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे पालिकेचे नगरसेवक जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली.

त्यातून १८ नगरसेवकांना नोटीस बजावली होती. त्यामुळे पालिकेचे नगरसेवक १८ पैकी ५ नगरसेवक कोकण विभाग कार्यालयात हजर झाले होते. त्यांचे मत कोकण आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी ऐकून नोंदवून घेतले. तसेच आरोपपत्र केले. कागदपत्रे तपासण्यास वेळ हवा आहे, अशी मागणी वकिलांनी केल्यामुळे कोकण आयुक्तांनी दोन्ही बाजू ऐकून घेत संबंधित नगरसेवकांना ५ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.