HomeठाणेKalyan : कल्याण रेल्वे मार्गालगत १११ झोपडीधारकांना नोटिसा

Kalyan : कल्याण रेल्वे मार्गालगत १११ झोपडीधारकांना नोटिसा

Subscribe

कल्याण । स्टेशनपरिसरात कल्याणमधील रेल्वे मार्गालगत बांधलेल्या झोपडपट्ट्या हटवण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करण्याची व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) जिल्हा सरचिटणीस मनोज नायर यांनी केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नायर यांनी म्हटले आहे की, आनंदवाडी-मिलिंदनगर रेल्वे केबिनजवळील झोपडपट्टीत सुमारे साठ ते सत्तर वर्षांपासून लोक राहत आहेत. अनेक कुटुंबांच्या दोन पिढ्या इथे गेल्या. लोकांना घरातून बेदखल केले तर ते कुठे जातील? त्यामुळे एमएमआरडीएच्या धारावी पॅटर्नप्रमाणे आधी पुनर्वसन करून मगच झोपडपट्टीवासीयांची घरे रिकामी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याणमध्ये रेल्वे रुळालगत उभ्या राहिलेल्या हजारो झोपडपट्ट्यांमध्ये सध्या १११ झोपडीधारक कुटुंबीयांना नोटीस पाठवून घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विभागात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. या झोपडपट्ट्या हटवण्यापूर्वी येथे राहणार्‍या लोकांना इतरत्र वसवावे, अशी विनंती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मनोज नायर यांनी आपल्या पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाला केली आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक जाती धर्माचे लोक गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्य करून राहत आहेत. नोटीसा देऊन घरे रिकामी करण्याचे झोपडीधारकांना सूचित करण्यात आल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रामुख्याने येथे भेडसावणारा ठरला गेला आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये वीज पाणी अन्य नागरी सुविधा गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासन देत आहेत. मात्र आता रेल्वे रुळालगत असणार्‍या या झोपडपट्ट्यांवर खाली करण्याच्या नोटीस अदा केल्याने झोपडपट्टी धारकांमध्ये संताप आणि भीती आहे. झोपडपट्ट्या खाली करण्याची कारवाई सुरू झाल्यास इथे मोठा उद्रेक निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.