मासिकपाळी दरम्यान सॅनिटरी पॅडऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर वाढतोय

ठाण्यातील 'आर निसर्ग' या स्वयंसेवी संस्थेने महिलांमध्ये मेंस्ट्रुअल कप वापरासाठीची जनजागृती करण्यासाठी घेतला पुढाकार

Now More Thousand Women Are Using Menstrual Cup In Thane
मासिकपाळी दरम्यान सॅनिटरी पॅडऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर वाढतोय

मासिक पाळी दरम्यान वापरण्यासाठी अनेक साधने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या सॅनिटरी नॅपकिन वापराकडे महिलांचा अधिक कल आहे. परंतु पाच ते सहा दिवस सतत पॅड वापरल्याने अनेक महिलांना त्वचेसंबंधीत आजार उद्भवत आहेत. याच सॅनिटरी पॅडला चांगला पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कप निर्मितीसाठी आता ठाण्यातील ‘आर निसर्ग’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. ठाणे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणाऱ्या  ‘आर निसर्ग’ संस्थेने आता मासिक पाळीत सॅनिटरी पॅडला चांगला पर्याय उपलब्ध केला आहे. या संस्थेने महिलांना सॅनिटरी पॅडमुळे होणाऱ्या समस्या लक्षात घेत एक हजारहून अधिक मेंस्ट्रुअल कप (मासिक कप)ची निर्मिती केली आहे. सध्या शहरात एक हजारांहून अधिक महिला त्याचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. या संस्थेच्या ‘सखी’ उपक्रमांतर्गत ठाण्यातील गोकुळनगर आणि लोकमान्यनगर विभागातील स्थानिक स्वयंसेविका या पर्यावरण स्नेही मेंस्ट्रुअल कप (मासिक कप) वापरासाठी महिलांना जागरुक करत आहेत. यासाठी शहरातील महिला डॉक्टर्स, परिचारिका, आशासेविका, स्वयंसेविकाची मदत घेतली जात आहे.

ठाणे शहरात दररोज ९०० मेट्रिक टन कचरा तयार होतो. यातच ठाणे पालिकेच्या प्रशिक्षण आणि जनजागृतीमुळे बरेच नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करत आहेत. मात्र या कचऱ्यामध्ये मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पॅडची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न ठाणे पालिकेसमोर निर्माण होत होता. ठाणे शहरात सध्या मासिक पाळी येणाऱ्या वयोगटातील सुमारे दोन लाख महिला आहेत. या महिलांमुळे अंदाजे दोन टन सॅनिटरी पॅड्सचा कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा नसल्याने शहरात पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी आता आर निसर्ग संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मासिक पाळीदरम्यान पुनर्वापर होऊ शकेल अशा कापडी घड्या किंवा मेंस्ट्रुअल कप (मासिक कप)चा पर्याय सुचविला जात आहे.
महिलांची मासिक पाळी आणि यादरम्यान वापरे जाणारे पॅड आणि त्याची योग्य विल्हेवाट याबाबत आजही कोण उघडपणे बोलण्यास लाज बाळगतात. त्यामुळेच आर निसर्ग संस्थेने शहरातील महिलांचे या विषयासंदर्भातील असणारे गैरसमज आणि एकंदरीत मासिक पाळीसाठी मेंस्ट्रुअल कप वापरणे किती फायदेशीर आहे याचे प्रबोधन केले जात आहे. यासाठी अनेक स्वयंसेविका, डॉक्टर, आशासेविका पुढे आल्या आहेत. गोकुळनगरमध्ये डॉ.वैशाल सुर्वे, डॉ. पद्मजा देसाई आणि डॉ. विनिता देभनाथ या मोहिमेचा प्रसार करत आहेत. त्यामुळे शहरात आता महिलांना मासिक पाळीसाठी पॅडऐवजी मेंस्ट्रुअल कप (मासिक कप)चा वापर करणे सोयीचे वाटत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात या उपक्रमाची सिद्धता दिसून आली आहे. आता आर संस्थेमार्फत या उपक्रमाचा विस्तार केला जात आहे.


हेही वाचा- ३१ मार्चपूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा पॅन Inactive होईलच आणि…