ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा ( प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर, तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागात शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या कालावधीमध्ये सुमारे ५० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी पाणी जपून वापरा असेच म्हणावे लागणार आहे. तसेच पावसाळा असल्याने नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असेही आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. ( On August 12 about 50 percent less water supply will be provided to Thanekar Municipal Corporation )
उल्हास नदीवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अशुद्ध पाणी पंपिंग स्टेशनच्या इनलेट स्क्रीन, चॅनल व पंप स्ट्रेनरमध्ये नदीमधून मोठ्या प्रमाणात कचरा आल्याने पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. हा कचरा काढण्याच्या काळात शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दु. २ या कालावधीमध्ये सुमारे ५० टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कळवले आहे. या कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पंपिग स्टेशनमध्ये अडकलेला कचरा काढण्याचे काम होणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितींमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
( हेही वाचा: Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू )
मुंबईतील पाणी कपात रद्द
बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईत करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात मागे घेतली आहे. जुलै 2023 मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली 10 टक्के पाणी कपात 9 ऑगस्टपासून रद्द केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक 1 जुलै 2023 पासून 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठा 80 टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.