बदलापूरमध्ये तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू, सुदैवाने अडीच वर्षांचा चिमुकला बचावला

बदलापूर : बदलापूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर आज, गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात तीन जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या अपघातातून एक अडीच वर्षांचा मुलगा बचावला.

बदलापूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून एका इनोव्हा कार पालिकेच्या दिशेने येत होती. या कारचालकाने बेलवलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर उड्डाणपुलावर थांबलेल्या दुसऱ्या दुचाकीला त्याने धडक दिली. या तिहेरी अपघात मनोज उचलानी यांचा मृत्यू झाला तर तनुजा थोरात, योगेश थोरात, अवंतिका चौधरी हे जखमी झालेत. तर कारचालक सौरभ कराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांकडून पुन्हा एकदा ‘गोध्राकांड’चा मुद्दा; म्हणाले, “…इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र”

हा अपघात इतका भीषण होता कारने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर एका दुचाकीचे दोन तुकडे झाले. तर कार फुटपाथवर चढली. मनोज उचलानी आणि अवंतिका चौधरी हे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह होते. तर उड्डाणपुलावर थांबलेले थोरात कुटुंबीय हे आपल्या मुलाला घेऊन दवाखान्यात जात होते. सुदैवाने या घटनेत अडीच वर्षीय रुद्र थोरात याला कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर जखमींना बदलापूरच्या दुबे आणि ग्रामीण रुग्णालयात हलवले होते. मात्र नंतर बदलापूरमधील एका खासगी रुग्णालयात जखमींना हलवण्यात आले. या अपघातामुळे उड्डाणपुलावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर तीव्र उतार आणि वळण असल्याने यापूर्वी सुद्धा या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. आज, गुरुवारी घडलेल्या घटनेप्रकरणी कारचालक सौरभ कराळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा – सीमावाद पुन्हा पेटणार? महाराष्ट्राने जाहीर केलेला निधी कर्नाटक रोखणार, बोम्मईंचा इशारा