ऐरोली-काटई फ्रीवेतील एक मार्गिका वर्षअखेरीस सुरू होणार

बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटात

ऐरोली- काटई फ्री वेच्या मार्गातील महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली – मुंब्रा (टप्पा एक) भागातील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामाची पाहणी केली. एकूण १.८ किलोमीटरचा हा बोगदा जवळपास पूर्ण झाला असून त्यातील अवघ्या पाचशेमीटरचे काम शिल्लक असल्याची माहिती यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सध्याच्या मार्गात ४५ मिनिटे ते एक तास या प्रवासासाठी लागतो आहे. या बोगद्यामुळे हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात होणार आहे. वर्षाअखेरीस या रस्त्याची एक मार्गिका वापरासाठी खुली होऊ शकणार आहे. तर मुंब्रा ते काटई ( टप्पा दोन)यासाठी ठाणे महापालिकेने भूसंपादन तातडीने करण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्याकडे डॉ. शिंदे यांनी केली.
कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई आणि ठाणे हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ऐरोली – काटई -फ्री वे उभारण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी मार्गातील ऐरोली ते मुंब्रा (टप्पा एक) भागात १.८ किलोमीटरचा बोगदा उभारला जातो आहे. या बोगद्यामुळे या भागातून होणारा बारा किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. तर हा टप्पा गाठण्यासाठी सध्याच्या घडीला ४५ मिनिटे ते एक तास इतका वेळ लागतो. मात्र बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात करता येणार आहे. १.८ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी या कामाबाबत माहिती दिली. ऐरोली ते मुंब्रा (टप्पा एक) या ३.७ किलोमीटर पट्ट्यातील हा १.८ किलोमीटरचा बोगदा जवळपास पूर्ण झाला आहे. यातील १.२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून अवघ्या पाचशे मीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऐरोली ते मुंब्रा (टप्पा एक) रस्त्यातील एक मार्गिका या वर्षाअखेरी सुरू होईल, अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहणीनंतर दिली. हे काम पूर्ण झाल्याने येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. तर या रस्त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली ही कनेक्टिविटी वाढणार असून त्याचा वाहनचालकांना फायदा होईल असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

पालिकेने तातडीने भूसंपादन करावे
तर याच प्रकल्पातील महत्वाचा भाग असलेल्या  मुंब्रा ते काटई (टप्पा दोन) या भागातील कामासाठी दुपारच्या सुमारास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. मुंब्रा ते काटई (टप्पा दोन) रस्त्यासाठी तातडीने भूसंपादन करण्याची मागणी यावेळी डॉ. शिंदे यांनी केली. भूसंपादन प्रक्रियापूर्ण झाल्यास रस्त्याचा उर्वरित भागही डिसेंबर २०२३ पर्यंत मार्गी लागेल असेही डॉ. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. या रस्त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली येथील प्रवाशांचा वेळ अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे या भागाची कनेक्टिव्हिटी वाढणार असणार आहे, असेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.

इंधनाची बचत होणार
मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीत ज्या अडचणी, समस्या आल्या त्या तातडीने सोडवण्यात आल्या. त्यामुळे याचे काम वेगाने पूर्ण होत असून यावरून लवकरच वाहतूक सुरू होणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. या उड्डाणपुलामुळे वाहनचालकांना कोंडी मुक्तप्रवास करता येणार आहे. मुंबई फ्री वेच्या धर्तीवर काटई -ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी ही मुंबई फ्री वेच्या धर्तीवर केले जाते आहे. अडथळे मुक्त आणि विना शुल्कप्रवास हा या रस्त्याची ओळख असणार आहे. त्यामुळे उपनगरातल्या वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.