घरठाणेठाण्यात १९२ पैकी १९ गणेशोत्सव मंडळांनाच परवानगी, ऑफलाइन अर्जांमुळे प्रक्रिया रखडली

ठाण्यात १९२ पैकी १९ गणेशोत्सव मंडळांनाच परवानगी, ऑफलाइन अर्जांमुळे प्रक्रिया रखडली

Subscribe

एकूण अर्जापैकी ११० अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने आल्याने प्रशासनाने त्या मंडळांना स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा आणि अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला आणून जमा करण्याबाबत सूचना वजा आवाहन केले आहे.

ठाणे – गणेशोत्सवात लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाल्यावर यासाठी एक खिडकी योजना सुरू केली. त्यातच, या परवानग्यासाठी ठाणेकर नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावे, म्हणून ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला. तरी सुद्धा अजून ठाण्यातील मंडळांचा गणेशोत्सवासाठी ऑफलाईन पद्धतीकडे कल जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अगदी काही दिवसांवर बाप्पांचे आगमन होणार असताना, परवानगीसाठी दाखल केलेल्या १९२ अर्जांपैकी अवघे १९ मंडळांना परवानगी मिळाली आहे. तर, एकूण अर्जापैकी ११० अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने आल्याने प्रशासनाने त्या मंडळांना स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा आणि अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला आणून जमा करण्याबाबत सूचना वजा आवाहन केले आहे.
गणेशोत्सव व मोहरम या सणाच्या काळात उभारण्यात येणाऱ्या मंडप, लाउड स्पीकर यांच्यासह विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. त्यातच या परवानग्या घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची फरफट होवू नये, यासाठी पालिका प्रशासनाकडून कंबर कसली आहे. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यातच महापालिकेने ऑनलाईन पद्धतीसोबतच ऑफलाईन पध्दतीने देखील अर्ज स्विकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेकडे दोन्ही पद्धतीने १९२ अर्ज दाखल झाले आहेत. मंडपासाठी अर्ज केल्यानंतर प्रभाग समितीमधील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून स्थळ ठिकाणी जाऊन मंडपाच्या आकाराची पाहणी केली जाते. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पुढे केला जातो. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा आणि अग्निशमन विभाग या विभागांचा ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते प्रमाणपत्र दिल्यानंतर अर्ज अंतिम स्वरुपात निकाली निघतो. त्यानुसार ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या ८२ अर्जांपैकी केवळ ९ मंडळांना तिन्ही विभागाचे ना हरकत दाखला मिळाल्याने त्यांना परवानग्या दिल्या गेल्या.
दरम्यान, दुसरीकडे ऑफलाईन पद्धतीने आतापर्यंत ११० अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १०८ अर्जांवरील प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभाग या विभागांनी ना हरकत प्रमाणपत्राच्या कारवाईसाठी पुढे पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी केवळ १० मंडळाकडूनच ह्या तिन्ही विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र जमा केल्याने केवळ त्यांनाच परवानग्या मिळालेली आहे.
“ज्या मंडळानी ऑफलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्या मंडळांनी लवकरात लवकर स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा आणि अग्निशमन या तिन्ही विभागाकडून ना हरकत दाखला मिळवून तो संबंधित प्रभाग समिती स्तरावर अथवा पालिका मुख्यालयात जमा करावे,” अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -