न्यायप्रविष्ट मोकळ्या जागेवर वाहन पार्किंगला विरोध

 झोपडपट्टीवासी पोलिसांमध्ये बाचाबाची,संतप्त महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतले

मोहने पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या किमान सव्वा एकर एनआरसी कारखान्याच्या मोकळ्या जागेवर वाहनांचे पार्किंग झोन उभारण्यासाठी येथील काही ठेकेदारांनी बुधवारी प्रयत्न केला.  येथील किमान पाचशे सहाशे नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडल्याने आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाची  हमरीतुमरी झाली. त्यानंतर येथील कार्यकर्त्या मालनबाई साठे यांनी या दडपशाहीच्या विरोधात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एनआरसी कारखान्यातील जागा भुईसपाट करण्यास प्रारंभ केला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असणाऱ्या मोहने पोलीस चौकी जवळील सव्वा एकर मोकळ्या जागेवरून व्यवस्थापन आणि झोपडपट्टीवासीयांमध्ये वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून दलित-बहुल झोपडपट्टी अस्तित्वात असून पालिकेला ते घरपट्टी, पाणीपट्टी देयके भरत असून विद्युत पारेषण विभागाला विद्युत देयकाचा भरणा नियमित भरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

दुपारच्या सुमारास काही जणांनी वाहन पार्किंग झोनची उभारणी करण्याकरता जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता झोपडपट्टीवासीयांनी याला जबर विरोध केला. त्यानंतर घटनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. या बाबत महिला आंदोलक आक्रमक झाल्याने खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार, त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलिसांबरोबर बाचाबाची, धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडण्यात आला आहे. वातावरण अधिक तापू लागल्याने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बाबत खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार तसेच कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचचला नाही.