मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या लोखंडी जॉइण्डचा भाग निखळल्याने पुलावरून वाहन गेल्यावर काही भाग हालत असल्याची बाब बुधवारी वाहनचालकांनी मनसेच्या निर्दशनास आणून दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, दुरुस्तीचे तातडीने हाती घ्यावे यासाठी मनसेने आंदोलन केले. याचदरम्यान, त्या रस्त्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची गाडी जात असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी थांबवून त्यांना तो प्रकार दाखवून दिला. या आंदोलनानंतर एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतुक विभागांनी धाव घेत, त्या पुलाची पाहणी केली. त्यावेळी पूलाच्या लोखंडी जोडणीमध्ये मोठी भेग पडल्याचे तसेच बेअरिंगचा भाग निखळल्याचे समोर आले. त्यानंतर एमएसआरडीसीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती असल्याने जो भाग हालत आहे, त्या ठिकाणी बॅरिकेट लावून वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे साकेत ते माजीवडा उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तसेच या कामाला आठ दिवस लागणार असल्याने काही दिवस वाहतूक कोंडी राहणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
मुंबई कडून नाशिककडे जाणाऱ्या या साकेत पुलाचे काम साधारपणे १९९२ साली करण्यात आले. त्यानुसार या पुलाला ३२ वर्षे झाली आहे. दरवर्षी हा पूल पावसाळ्यात त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे चर्चे येत होता. मात्र यंदा त्या पुलावर मास्टीक टाकण्यात आल्याने खड्डे मुक्त तो पूल झाल्यानंतर आता लोखंडी जॉइण्डचा भाग निखळल्याने पुलाचा काही भाग हालत होता. ही बाब बुधवारी सकाळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणली. त्यानंतर मनसेचे शहर प्रमुख रवि मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन तसेच प्रशासनाला जाग येण्यासाठी त्यांनी याठिकाणी आंदोलन करुन सर्वांच्याच ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर याठिकाणी जो भाग निखळला होता. त्याठिकाणी बॅरीकेट्स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे साकेत पूल ते माजीवडा उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाशिकच्या दिशेने जात होते. वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या वाहन चालकाने विरुद्ध दिशेने वाहन चालवून प्रवास केला. केंद्रीय मंत्र्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
” मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी साधारपणे आठ दिवसांचा कालावधी लागणार असला तरी तेथून वाहतुक सुरु ठेवली जाणार आहे. उजवी आणि डावीकडून वाहतुक सुरु ठेवण्यात आली असली तरी नाशिककडे जाणारी वाहतुक एकेरी पध्दतीने सुरु ठेवली जाणार आहे. “- डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
” या पुलाखालील बाजूस बेअरींगची समस्या असण्याची शक्यता आहे. परंतु घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणचा सर्व्हे करण्यात आला असून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे.”-सुभाष बोरसे – कार्यकारी अभियंता,एमसआरडीसी
” या पुलावरून जात असताना हा प्रकार काही जणांनी निर्दशनास आणून दिला. यावरून साकेत पूलाची स्थिती भयंकर आहे. हा पूल कोसळल्यास अनेक अपघात होऊ शकतात. त्यामुळे पूलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.”- रामदास आठवले, केंद्रीय मंत्री