घरठाणेरुग्णांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद; सेवानिवृत्त नर्स संध्या रसाळ यांचा अनोखा उपक्रम

रुग्णांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद; सेवानिवृत्त नर्स संध्या रसाळ यांचा अनोखा उपक्रम

Subscribe

संध्या रसाळ यांनी स्वयंपूर्तीने रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात आपल्या हाताने पिठलं भाकरी बनवून ती रुग्णांना खाऊ घातली आहे. चपाती ऐवजी भाकरी मिळाल्याने रुग्णांनी मोठया आवडीने पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला.

महाराष्ट्र आणि पिठलं- भाकरी हे एक वेगळेच नाते झाले आहे. त्यातच रुचकर पदार्थाचा आस्वाद शक्यतो रुग्णालयातील उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना घेता येत नाही. तसेच रुग्णालयात शक्यतो भाकरी मिळत नाही या उद्देशाने सोमवारी ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना ( सामान्य) शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त झालेल्या माजी महिला वॉर्डच्या नर्स संध्या रसाळ यांनी स्वयंपूर्तीने रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात आपल्या हाताने पिठलं भाकरी बनवून ती रुग्णांना खाऊ घातली आहे. चपाती ऐवजी भाकरी मिळाल्याने रुग्णांनी मोठया आवडीने पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला.
रसाळ या नोव्हेंबर २०२० मध्ये ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील महिला वॉर्डच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. रुग्णालयात कार्यरत असताना निराधार रुग्णाला नित्यनियमाने त्या घरून तयार केला डबा आणून देत.

त्यातच कोरोना कालावधीत रुग्णांना आपल्या हातून खाऊ घालण्याच इच्छा त्यांच्या मनी होती. ती इच्छा ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार यांच्या समोर ठेवली त्यांनी हे जेवण रुग्णालयाच्या स्वयंपाक घरात करण्याच्या अटीवर होकार दिला. त्यानुसार सोमवारी सकाळी रसाळ आणि त्यांच्या नातेवाईक अंजना तलवार, सुवर्णा शिर्के आणि मंगल काणवल यांनी साहित्य आणून पिठलं-भाकरी आणि चटणी बनवली. हे पदार्थ आहारतज्ञ प्रिया गुरव यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले. रुग्णालयाच्या वरण- भातासह पिठलं भाकरी आणि चटणी रुग्णांना दुपारच्या जेवणात देण्यात आले. यावेळी, ७५ जणांनी या रुचकर पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला.

- Advertisement -

” नैतिक जबाबदारी आणि ऋण बंधनातून कोरोनाग्रस्त रुग्णांना जेवण देण्याची इच्छा होती. त्यातून काय दयावे हा प्रश्न होता. रुग्णांना भाकरी मिळत नाही त्यातून पिठलं भाकरी जेवणात दयावे असे वाटले आणि रुग्णालयाने ही त्याला होकार दिला. त्यानुसार पिठलं भाकरीचा केलेला बेत अखेर यशस्वी झाला. ”
– संध्या रसाळ, माजी नर्स

” रुग्णालयात बाहेरून जेवण आणून रुग्णांना देण्यास बंदी आहे. म्हणून ते जेवण रुग्णालयाच्या स्वयंपाक घरात तयार केले गेले. नेहमीपेक्षा वेगळे आणि चपाती ऐवजी भाकरी आणि भाजी ऐवजी पिठलं जेवणात होते. तसेच रसाळ या रुग्णालयातील माजी नर्स असल्याने त्यांचे आणि रुग्णांचे आपुलकीचे नाते आहे. ” – प्रिया गुरव, आहार तज्ञ, ठाणे जिल्हा रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -