घरठाणेठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी देण्याचा वेग वाढला, मंडळांची संख्याही वाढली

ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी देण्याचा वेग वाढला, मंडळांची संख्याही वाढली

Subscribe
ठाणे – गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी मंडळांना परवानगी देण्यासाठी महापालिकेसह संबंधित यंत्रणांचा वेग वाढला आहे. आतापर्यंत परवानगीचा आकडा १९ वरून ९४ वर पोहोचला आहे. त्यातच, आता गणेशोत्सव मंडळांची संख्याही १९२ हुन वाढून २४७ झाली आहे. बाप्पांचे आगमन अगदी काही दिवसांवर आल्याने उर्वरित मंडळांना ही लवकरात लवकर परवानगी दिली जाईल असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तर दुसरीकडे ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन पद्धतीवरच मंडळांचा अधिक विश्वास असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ऑफलाईन १५१ तर ऑनलाईन ९६ मंडळांचे अर्ज परवानगीसाठी महापालिकेत दाखल झालेले आहेत. तर वागळे इस्टेट परिसरातील सर्वाधिक २४ मंडळांना आतापर्यंत मंजुरी मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंडळांना मंडप परवानगी तत्काळ मिळावी यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्विकृती प्रक्रिया सुरू केली होती. मागील २३ जुलैपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्याला मंडळांनी उशिराने प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मागील आठवड्यापासून मंडळांनी अर्ज सादर करण्याचे प्रमाण वाढविले असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडे १९२ अर्ज दाखल झाले होते. पैकी १९ मंडळांनी मंडप उभारणीची परवानगी दिली होती. वाहतूक, स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्निशमन विभागाकडून उशीर होत असल्याचा दावा पालिकेने केला होता.
या संदर्भातील महापालिकेच्या संबंधित विभागाने वाहतूक व इतर दोन विभागांचा पाठपुरावा करून त्यांच्याकडे आलेले अर्ज निकाली काढण्यासाठी हालचालींना वेग आल्याने आतापर्यंत तब्बल ९४ मंडळांना मंडप उभारणीला परवानगी देण्यात आली. त्यातही नऊ मंडळांनी ऑफलाईन आणि ऑनलाईनलाही अर्ज केल्याने त्यांची परवानगी रखडल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग समिती निहाय मंजुरी दिलेले अर्ज
समिती – अर्ज
कोपरी  – ०१
नौपाडा – ०६
वागळे – २४
लोकमान्य – १४
वर्तकनगर – ०७
माजिवडा मानपाडा – १०
उथळसर – १०
कळवा – १८
मुंब्रा – ०२
दिवा – ०२
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -