फटका गँगच्या इसमाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग

रेल्वे पोलिसांनी केले जेरबंद

technical glitch disrupted the fast local service to churchgate mumbai

लोकल, मेल, एक्सप्रेस ट्रेन मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स , बॅग पळविणार्‍या फटका गँगच्या सराईत गुन्हेगाराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी जेरबंद केले आहे. अजय अर्जुन कांबळे असे जेरबंद केलेल्या फटका गँगच्या आरोपीचे नाव आहे.

मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणार्‍या लोकल, मेल ट्रेनमधून दरवाजात उभे राहून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हातावर फटका मारुन मोबाईल, इतर वस्तू पळविणार्‍या विरोधात कारवाईची मोहीम १६ मार्च पासून राबविण्यात येत आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी तपास पथकाची नेमणूक केली. या पथकात पोलीस उपनिरक्षक पवार, पोलीस कर्मचारी कुटे,जगताप, विशे, चव्हाण, शेळके, केदार आणि व्हरकट यांना सुचना व मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास डाऊन बदलापूर लोकलच्या मोटरमन बाजुकडील प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यात डाव्या बाजुच्या दरवाज्यात उभे राहून एक महिला प्रवास करीत होती.

त्यावेळी लोकल कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान धीमी झाली असताना अजयने महिलेच्या हातावर जोरदार फटका मारून महागडा मोबाईल खाली पाडला आणि मोबाईल घेऊन पळून जात असताना पोलीस शिपाई केदार आणि पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. बुधवारी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी दिली.