जिल्हा शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची रोवली जाणार मुहूर्तमेढ

रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा काढली

प्रातिनिधीक फोटो

मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे हाती घेतल्यानंतर विकास कामाचा श्रीगणेशा ठाण्यातून व्हावा. यासाठी शिंदे यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे 900 खाटांचा सुपर स्पेशालिटी नवे ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या कामाला होणारा विलंब लक्षात घेत, ठाण्यातील बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाची खरडपट्टी काढून तातडीने निविदा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागून त्यांनी निविदा काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रक्रियेमुळे येत्या सप्टेंबर महिन्यात या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडेल अशी शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयाची सध्याची क्षमता 300 खाटांची असून येथे ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या दोन्ही जिल्ह्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यातच अनेक आधुनिक उपचार येथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्यामुळे त्यांना मुंबईला पाठवावे लागते.

तातडीने उपचार मिळाल्यास असे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन या रुग्णालयाच्या जागेवर सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी तयार केला होता. हा प्रस्ताव मार्गी लागावा यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही होते. या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली होती.

या प्रस्तावानुसार रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने 527 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर केला होता. असे असले तरी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाची निविदा काढण्यात चालढकलपणा केला जाताना दिसत होता. निविदा प्रक्रीयेस विलंब होत असल्यामुळे रुग्णालयाचे काम लांबणीवर पडत असल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान, निविदा प्रक्रीयेस विलंब होत असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत अधिकार्‍यांना फौलावर घेत निविदा तातडीने काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच निविदा काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.