रक्तदाब, मधुमेहाने पोलीस त्रस्त

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या वतीने पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी आरोग्य शिबीर रुग्णालयाच्या आवारात आयोजित करण्यात आले. या वेळी सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह इतर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचार्‍यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हा शक्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांनी दिली.

शहरातील एकून चार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वसंतराव मोरे, डॉ सुहास मोनाळकर, डॉ मृणाली रहुड, डॉ साळवे, डॉ तृप्ती रोकडे, डॉ वर्षा दवानी, डॉ शीतल थोरात यांच्यासह विविध विभागातील तज्ञ डॉक्टर तपासणी शिबिरात सहभागी झाले होते. रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ते नितीन गावंडे यांनी शिबिराची माहिती दिली. शिबिरात 300 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. आरोग्य तपासणीत अनेक पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले. मध्यवर्ती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.