उल्हासनगरात जुगार खेळणाऱ्या सात महिलांवर पोलिसांची कारवाई

48 हजाराची रोकड जप्त

उच्चभ्रू महिलांच्या सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारावर मध्यवर्ती पोलिसांनी छापा मारला आहे. त्यात 7 महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून 48 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

वीस सेक्शन परिसरात एका फ्लॅटमध्ये उच्चभ्रू महिलांचा तीनपत्ती जुगाराचा डाव रंगला आहे. अशी माहिती मिळताच मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक महेश बंडगर, महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता बाविस्कर, पोलीस नाईक सविता भांगरे आदींनी छापा टाकला असता 7 महिला तीनपत्ती जुगारात मग्न असल्याचे निदर्शनास आले. शंभर ते 500 च्या अशा 48 हजारांच्या नोटा डावात आढळून आल्या.

या सर्व नोटा जप्त करून या सात महिलांना मुंबई जुगार कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कलम कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यातील म्होरकी असलेल्या एका महिलेवर यापूर्वी जुगाराचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश बंडगर करत आहेत.