घरठाणेपात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजुरी द्या अन्यथा कडक कारवाई

पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजुरी द्या अन्यथा कडक कारवाई

Subscribe

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा इशारा

ठाणे । बँकांनी गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्या प्रकरणांना तातडीने मंजुरी देण्याची भूमिका स्वीकारावी. यापुढे ज्या बँका जिल्हा प्रशासन आणि पात्र लाभार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा कडक शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बँक अधिकार्‍यांना तंबी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डी. एल. सी. सी. आणि डी. एल. आर. सी. ची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नागेंद्र मंचाल, रिझर्व बँकेचे अधिकारी अरुण बाबू, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक सुशांत कुमार, उद्योग विभाग कोकण विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे मुख्याधिकारी शिवाय काही खाजगी बँकांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी खरीप पीक कर्जाचे वाटप व रब्बी पीक कर्जाचे वाटप एकूण पीक कर्जामध्ये दिलेल्या उद्दिष्टापैकी 76 टक्के उद्दिष्ट 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँकांनी पूर्ण केलेले आहे, उरलेले उद्दिष्ट 28 फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण करावे, सर्व बँकांनी प्राथमिकता क्षेत्रातील कर्ज वाटप वाढवावे, पीएम स्वनिधीचे ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेंतर्गत बँकांनी उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त अर्जदारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा, दिलेले उद्दिष्ट फेब्रुवारी 2024 या महिनाअखेर पूर्ण करावे, जन मन योजनेंतर्गत कातकरी समाजाच्या जास्तीत जास्त लोकांची जनधन खाती उघडावीत, शिवाय पात्र कातकरी बांधवांना केसीसी कर्ज द्यावे, जिल्हा प्रशासनाने बँकांकडे मागितलेली माहिती वेळच्या वेळी द्यावी, असे स्पष्ट निर्देश उपस्थित बँक अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

यावेळी नाबार्डचे अधिकारी सुशांत कुमार यांनी पोटेन्शिअल लिंक क्रेडिट प्लॅन 2024-25 पुस्तकाचे जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सोशल नेटवर्क वर कर्जमाफीसंदर्भात खोटे संदेश पाठविले जात आहेत, त्या संदर्भात सर्वांनी सावधानता बाळगावी व अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशांचे सर्व बँका काटेकोर पालन करतील, असे आश्वासित करुन उपस्थित सर्वांचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नागेंद्र मंचाल यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -