घरठाणेनव्या मासळी मार्केटचा प्रस्ताव १७ वर्षे कागदावरच

नव्या मासळी मार्केटचा प्रस्ताव १७ वर्षे कागदावरच

Subscribe

नव्या मासळी मार्केटचा प्रस्ताव १७ वर्षे कागदावरच

कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या १७ लाखांहून अधिक आहे. एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात नगरपालिका काळापासून अवघे दोनच मासळी मार्केट आहेत. मात्र या दोन्ही मार्केट्सची पुरती दुरावस्था झाली आहे. पालिका प्रशासनाची अनास्था आणि सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या २५ वर्षात एकही नवीन मासळी मार्केट निर्माण झाले नाहीच. तसेच जुन्या मार्केटचे जागी नवीन मार्केट बांधण्याचा प्रस्ताव देखील गेल्या १७ वर्षांपासून कागदावरच धूळ खात राहिला आहे.

शहर विकास नियोजनाच्या निकषानुसार प्रत्येकी ५० हजार लोकसंख्येसाठी एक भाजी मंडई आणि एक मटण – मासळी मार्केट्सची आवश्यकता आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवलीत किमान ३०-३५ मार्केट्स असायला हवीत. मात्र प्रत्यक्षात ६ भाजी मंडया आणि २ मटण मासळी मार्केट्स आहेत. महापालिकेच्या निर्मिती नंतर अवघ्या ३ भाजी मंडया पालिकेने उभारल्या मात्र तेथे भाजी विक्रेते बसतच नसल्याने त्या मंडयांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले आहे. उर्वरित सर्व भाजी मंडया आणि मटण मासळी मार्केट्स नगरपालिका काळापासूनची असून त्यांची योग्य ती देखभाल दुरुस्तीही वेळोवेळी न केल्याने या मटण – मासळी मार्केट्सची पुरती दुरावस्था झाली आहे.

- Advertisement -

त्या जुन्या मार्केटच्या जागी नवीन अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त नवीन मार्केट्सची उभारणी करावी,अशी मागणी वारंवार होत आहे. पालिकेने १७ वर्षांपूर्वी केलेल्या एका सर्व्हे नुसार कल्याणच्या मासळी मार्केटमध्ये मटण-मासळी विक्रेत्यांचे ३० तर डोंबिवलीच्या मटण-मासळी मार्केटमध्ये विक्रेत्यांचे ६० ओटे होते.आता त्या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. या दोन्ही मार्केट्सच्या इमारती बैठ्या असून अत्यंत जीर्ण झाल्या असल्याने सांडपाण्याचा निचराही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होवून मार्केटची दुर्गंधी रस्त्यावरून चालणार्‍या नागरिकांना असह्य होत असते.

१७ वर्षांपूर्वी कल्याण आणि डोंबिवलीतील मासळी मार्केटचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला होता. एव्हढेच नव्हे तर महापालिकेच्या मागील तीन निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मटण-मासळी मार्केट्स अद्यावत बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. केंद्रात ,राज्यात आणि महापालिकेत देखील शिवसेना-भाजपाची सत्ता होती .कल्याण डोंबिवलीत युतीचेच आमदार,खासदार आणि मंत्री होते तरीही कल्याण डोंबिवलीत नवीन मटण मासळी मार्केट्स उभारण्याचा अत्यंत छोटासा विषय तत्कालीन सत्ताधार्‍यांना मार्गी लावता आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवू नका, किमान सोयी सुविधा असणारी राहण्यायोग्य अशी तरी बेसिक सिटी बनवा, अशीच कल्याण डोंबिवलीकरांची मागणी आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -