घरठाणेस्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी एल्गार

स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी एल्गार

Subscribe

बेरोजगार संघर्ष सेना स्थापन

औद्योगिक वसाहती, प्रस्तावित एमआयडीसी यांसह विविध रोजगाराची साधने तालुक्यात उपलब्ध असतानाही स्थानिक भूमिपुत्र मात्र रोजगारापासून वंचित राहिला आहे. तालुक्यातील बेरोजगार भूमीपुत्रांसाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप न होऊ देता प्रसंगी एल्गार पुकारून त्यांच्या न्याय हक्कासाठी बेरोजगार संघर्ष सेनेच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही बेरोजगार संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली. याबाबत रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असला तरी आजही स्थानिक भुमिपुत्र मात्र रोजगारापासून वंचित आहेत. मुंबई महानगराजवळ असलेला शहापूर तालुका रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग यांनी जोडला गेला असून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गही होत आहे. दळणवळणाच्या या साधनांमुळे तालुक्यात ठिकठिकाणी कंपन्यांचे जाळे पसरले असून खर्डी येथे एमआयडीसी देखील प्रस्तावित आहे. असे असले तरी आज तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक कारखाने व औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असून ते दिशाहीन होत चालले आहेत. त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बेरोजगार संघर्ष सेना स्थापन करण्यात आली असून विविध उद्योग प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना प्रसंगी एल्गार पुकारून प्राधान्याने नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका बेरोजगार संघर्ष सेनेची राहील असे संतोष शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

यावेळी बेरोजगारी आणि कारखानदारांच्या जाचक अटी बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शिंदे यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी ज्ञानेश्वर तळपाडे, विजय देशमुख, गौतम गोडे, राजेश पाठारी, राम भोईर, दीपक चंदे, गणेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन बेरोजगार संघर्ष सेना स्थापन केली असून या माध्यमातून स्थानिक बेरोजगार भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान या संघर्ष सेनेचे औपचारिक उदघाटन २४ फेब्रुवारीला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व बेरोजगार युवकांनी बेरोजगार संघर्ष सेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -