ठाण्यात संजय सोनवणे यांच्या चांदोबा रे चांदोबा बालकवितासंग्रहाचे प्रकाशन; साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती  

लहान मुलांच्या विश्व मोठ्यांमुळे संकुचित व्हायला नको, कोरोना काळात त्यांच्यावर मोबाईलच्या चौकटीत आलेली बंधनं दूर होऊन त्यांना आभाळ मोकळं करण्याची जबाबदारी आता मोठ्यांची आहे. असे मनोगत संजय सोनवणे यांनी व्यक्त केले.

ठाण्यात संजय सोनवणे यांच्या चांदोबा रे चांदोबा बालकवितासंग्रहाचे प्रकाशन; साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
  Publication of Sanjay Sonawane's Chandoba Re Chandoba Children's Poetry Collection in Thane

ठाण्यातील टेंभी नाका येथील ठाणे नगर वाचन मंदिर सभागृहात संजय सोनवणे यांच्या चांदोबा रे चांदोबा या बालकविता संग्रहाचे प्रकाशन १४ आॅगस्ट २०२१ रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी आपलं महानगरचे संपादक संजय सावंत आणि आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक, चित्रकार अरविंद दोडे होते. सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशनचे सुभाष कुदळे यांची उपस्थिती होती.

राजा कांदळकर, अनुपमा उजगरे आणि ठाणे नगर वाचन मंदिर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार आणि लेखक राजेश दाभोळकर यांनी मराठीतील बालसाहित्याचे संदर्भ देऊन कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ लेखक आणि कवी, गझलकार आणि  विनोद पितळे यांनी आभार मानले. चिमुकल्यांच्या उपस्थितीत चांदोबा रे चांदोबाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

बालकवितांचे लेखन करणे इतर कविता करण्याच्या तुलनेत थोडे कठिणंच असते, त्यासाठी लहान व्हावे लागते संजयने या कविता लिहताना तो स्वतः लहान झाला आहेच, मात्र या कवितांमध्ये मोठ्यांसाठीही बरंच काही आहे. याशिवाय सध्याच्या स्थितीत कोरोनामुळे लहान मुलांचं जग जे मोबाईलबंद झालं आहे. संजयने तो सुद्धा कवितेचा विषय म्हणून लहान मुलांच्या भावविश्वातून समोर आणला आहे.

 

हे एक उदाहरण झालं या शिवाय या बालककवितासंग्रहात असेच मोठ्यांना भावतील असेही विषय त्याने लहानग्यांच्या दृष्टीकोनातून मांडले आहेत, असे गौरोवोद्गार आपलं महानगरचे संपादक संजय सावंत यांनी काढले. यावेळी त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेली समकालीन पत्रकारिता आणि साहित्य तसेच लेखनक्षेत्रासमोर आव्हानेही विषद केली. सध्याच्या काळात वाचनसंस्कृती कमी होत असताना संजयने पुढे आणलेला चांदोबा रे चांदोबा हा कवितासंग्रह लहान मुलांसह मोठ्यांनाही वाचनाची आवड निर्माण करेल आणि अशा सदिच्छा

त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.  यावेळी संजय सोनवणे यांना दैनिक आपलं महानगर तसेच संजय सावंत आणि संजय परब यांच्याकडून उल्लेखनीय लेखकांच्या पुस्तकांचा पुस्तकसंच भेट देण्यात आला.संजय सोनवणेचे कविता किंवा ललित तसेच इतर लेखन हे वरवरचे नसून त्याने आपलं महानगरमध्येही लिहलेल्या अनेक लेखात त्याची सामाजिक तळमळ आणि मनापासून व्यक्त केलेली विविध विषयावरील आत्मियता व्यक्त होत असते.

 

तीन वर्षांपूर्वी संजय सोनवणे आपलं महानगरच्या कुटुंबात दाखल झाल्यावर त्याच्या लेखनातील सातत्य आणि विषयाकडे पाहाण्याची खोली ही त्याच्यात मला त्याच्यासोबत काम करताना सातत्याने दिसत आलेली आहे, असे आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब यांनी म्हणाले, ललित, नाट्य, बालकविता, लेख लिहणे आणि पत्रकारिता करणे हे वेगळे आहेत. संजयचे लेखन जवळून पाहात असताना भविष्यात मला त्यात एक उत्तम लेखक, कवी, साहित्यीक घडताना दिसत आहे, असे संजय परब म्हणाले. माणसांच्या एकूणच कमी होत असलेल्या वाचनाविषयी त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली, प्रत्येकाने काही ना काहीतरी वाचायलाच हवं, असा आग्रह संजय परब यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अरविंद दोडे यांनी बालसाहित्याच्या इतिहासाचा आढावा घेतला. यावेळी इसापनितीच्या कथा या लहानग्यांसाठी लिहल्या गेलेल्या नाहीतच त्या मोठ्यांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णेच्या बाललिला या इतर आणि बाल साहित्यासाठीही मोठा ठेवा असल्याचे ते म्हणाले. 1806 पासून 1950 पर्यंतच्या बालसाहित्याच्या लेखनाच्या अनुषंगाने साहित्य क्षेत्रातील झालेला बदल त्यांनी अध्यक्षीय भाषणात विषद केला. चिऊताई चिऊताई दार उघड ही कविता लीळा चरित्रात आपणास आढळते असे ते म्हणाले. 1815 मध्ये मोडी भाषेत हितोपदेश छापण्यात आला तर पुढे 1828 मध्ये मुंबईत सदाशीव छत्रे यांनी बालमित्र, वेताळ पंचविशी, बोधकथा सुरू केल्या. या शिवाय मराठीतील किशोर आणि इतर समकालीन पुस्तकांचाही त्यांनी आढावा घेतला.

 

बालकथा, बालकविता, बालरंगभूमीचा इतिहास आणि त्याचा त्या त्या काळात झालेल्या बालसहित्यावरील परिणाम आणि त्यांची वैशिष्ट्ये यावर त्यांनी सखोल विश्लेषण केले. बालसाहित्याविषयीचे आणि सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे विविध संदर्भ देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दाभोळकर यांनी केले.लहान मुलांच्या विश्व मोठ्यांमुळे संकुचित व्हायला नको, कोरोना काळात त्यांच्यावर मोबाईलच्या चौकटीत आलेली बंधनं दूर होऊन त्यांना आभाळ मोकळं करण्याची जबाबदारी आता मोठ्यांची आहे. असे मनोगत संजय सोनवणे यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा- तानसा मार्गावरील धोकादायक पुलावरून हजारो प्रवाशांची ये-जा