कल्याण : दिवाळी सणानिमित्त इगतपुरीला गेलेली अल्पवयीन तरुणी मुंबईत येत असताना तिच्या प्रियकराने तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळा स्थानकात सिग्नलला एक्स्प्रेस थांबली असताना तरुणाने 15 वर्षांच्या मैत्रिणीचे अपहरण केले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pushpak Express A minor girl from Dombivali who was coming home from Diwali was abducted from the train)
हेही वाचा – धक्कादायक! बाप-लेकीच्या नात्याला काळिमा; बापाने केला मुलीवर अत्याचार, लेकीच्या मृत्यूनंतर आईचा आरोप
दिवाळी सणाच्या काळात ही तरूणी इगतपुरी येथील आपल्या नातेवाईकांकडे पाहुणी म्हणून गेली होती. 12 नोव्हेंबर रोजी या तरूणीने डोंबिवलीत कुटुंबीयांना फोन करून पुष्पक एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात येते असल्याचे आणि तिथून लोकलने डोंबिवली तिच्या घरी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीय तिची वाट पाहत होते. परंतु पुष्पक एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात येण्याची वेळ होऊन दोन तास उलटले तरी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी इगतपुरीला नातेवाईकांकडे फोन करून विचारणा केली. यावेळी नातेवाईकांनी मुलीला पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणला गेल्याचे कळवले. परंतु मुलगी घरी आली नाही त्यामुळे कुटुंबीय घाबरले. त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
रात्री 11 वाजले तरी मुलगी घरी आली नाही. तिचा मोबाईलही बंद येत होता. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिच्या एका मैत्रिणीशी संपर्क साधला. यावेळी तिच्या मैत्रिणीने सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेसला टिटवाळा परिसरात सिग्नलमुळे थांबा मिळाला होता. यावेळी मुलगी रेल्वे रुळावर उतरली आणि ती मित्र प्रशांत सोनावणेसोबत गेली. त्यामुळे कुटुंबीयांना वाटले की, मुलगी टिटवाळा भागात देवदर्शन किंवा फिरायला गेली असेल, ती परत येईल. मात्र चार दिवस उलटले तरी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे काळजीत असलेल्या कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी (16 नोव्हेंबर) मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तसेच प्रशांत सोनावणे याने मुलीचे अपहरण केल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले.
हेही वाचा – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची पुन्हा धमकी; दिला ‘असा’ इशारा
लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले, एका 15 वर्षाच्या मुलीचे टिटवाळ्याजवळून तिच्या मित्राने अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. प्रशांत सोनावणे असे गुन्हा दाखल केलेल्या तरूणाचे नाव आहे. अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी डोंबिवलीत शेलार नाका भागात आपल्या कुटुंबीयांसह राहते. या मुलीचे एका तरूणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विशेष पथके स्थापन करून आम्ही पुढील तपास सुरू केला आहे.