घरठाणेशहापुरच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

शहापुरच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

Subscribe

शहापुरच्या विकासाचा उद्देश समोर ठेऊन तयार करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा शहापुर नगरपंचायतीने प्रसिद्ध केल्यानंतर या आराखड्यावर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. नगरपंचायत क्षेत्रात टाकलेल्या वीस प्रकारच्या विविध आरक्षणावर चारशेहून अधिक हरकती आल्या असून अजूनही हरकती सुरूच आहेत. या आरक्षणामुळे शहापुरातील सामान्य नागरिक, शेतकरी, आदिवासी शेतकरी चिंतातुर झाला असून याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शहापुरात झालेल्या बैठकीत कोणताही शेतकरी भूमिहीन होणार नाही तसेच अन्यायग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज उपस्थित नागरिकांना आश्वासित केले.

आगामी वीस वर्षे विचारात घेऊन नगररचना विभागाने शहापुर नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा तयार करून शहापुरच्या नागरिकांसमोर प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये गार्डन, घनकचरा व्यवस्थापन, प्ले ग्राउंड, मच्छी – मटण मार्केट, भाजीपाला मार्केट, अग्निशमन केंद्र, सांडपाणी प्रकल्प, शॉपिंग कॉम्प्लेक्स व इतर नागरी सुविधांसह वीस प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले आहे. चारशेहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहापुरातील वैश्यसमाज सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक किशोर पाटील, शहापुर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड, तहसिलदार कोमल ठाकूर, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, भाजपचे विवेक नार्वेकर, भास्कर जाधव, अशोक इरणक, राजेश खंबायत यांसह शहापुरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. यावेळी शिवतीर्थाच्या मागच्या जमिनीवर टाकण्यात आलेले मच्छी मार्केट, भूमिहीन होणार्‍या आदिवासी क्षेत्रावर व नाल्यालगत टाकण्यात आलेले घनकचरा व्यवस्थापनाचे आरक्षण, प्ले ग्राउंड चे आरक्षण, कासार आळीतील असंख्य घरांवर टाकलेले आरक्षण तसेच रस्त्यांची वाढवलेली रुंदी आवश्यक आहे का? यांसह विविध आरक्षणावर नागरिकांनी हरकत घेतली आहे.

- Advertisement -

यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी, आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यांसह विविध ठिकाणी टाकलेल्या आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज उपस्थितांना दिले. या अन्यायग्रस्त आरक्षणामुळे प्रारूप विकास आराखड्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, शहापुरातील कस्तुरी कॉम्प्लेक्स येथील प्रवेशद्वाराचे उद्घाटन, तहसील कार्यालयाजवळील स्वच्छतागृहांच्या कामाचे भूमिपूजन तसेच नगरपंचायत कार्यालयासमोरील उद्यान आदी कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -