वेळीच अशा प्रवृत्तीला ठेचा- राज ठाकरे

पोलिसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील

रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची केली विचारपूस

ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बुधवारी ठाण्यातील खासगी रुग्णालयात जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेत विचारपूस केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी हा हल्ला दुःखद आहे. तसेच असे हल्ले करणार्‍या हल्लेखोरांच्या हिमतीला वेळीच ठेचणे गरजेचे आहे. तर, आमचे आंदोलन अधिकृत फेरीवाल्यांविरोधात नसून ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आहे. याबाबत, पोलीस आणि न्यायालय उचित कारवाई करतील, असा विश्वास यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी सायंकाळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्याने ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. पिंपळे सध्या ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे. त्यानंतर, राज ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.