रस्ते अपघात कमी करण्याला सरकारचे प्राधान्य

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, रस्ते सुरक्षा अभियानाचा समारोप

three roads thane reserved morning walk vehicles are banned5- 7morning

दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. दर चार मिनिटाला एक बळी जातो, ही चिंतेची बाब असून दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या सर्वंकष विकासाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक पोलिस विभागाने आयोजित केलेल्या रस्ते सुरक्षा अभियान २०२१ या महिनाभर सुरू असलेल्या मोहिमेचा समारोप बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. याप्रसंगी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सहआयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त दत्ता कारळे, संजय ऐनपुरे, अनिल कुंभारे, प्रवीण पवार, उपायुक्त बाळासाहेब पाटील, तसेच या मोहिमेचे ब्रँड अँबॅसिडर मंगेश देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, ठाणे व परिसरात अनेक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचेही नियोजन आहे. फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, कोपरी-पटणी खाडी पुल, कोलशेत-गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी पुल रुंदीकरण अशा अनेक प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटायला मदत होणार आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी व्हावी, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होईल आणि अपघातांची संख्या कमी होण्यासही मदत होईल. रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्स ही चिंतेची बाब असून नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या अपघाताच्या जागा राहाणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या ७०१ किमीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून राज्यात याच धर्तीवर पाच हजार किमीच्या अक्सेस कंट्रोल रस्त्यांचा, तसेच मुंबई-गोवा अक्सेस कंट्रोल रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. अपघात रोखण्यासाठी अद्ययावत सिग्नल यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी, तसेच ठाणे ते कसारा या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.

ही सुरक्षा मोहीम जरी महिनाभराची असली तरी पोलीस आणि वाहतूक पोलीस वर्षाचे १२ महिने ३६५ दिवस रस्त्यांवर असतात, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांचा गौरव केला. करोना काळातही पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून उल्लेखनीय काम केले. कम्युनिटी किचन सुरू व्हायच्या आधी पोलिसांनी गोरगरिबांना अन्न द्यायला सुरुवात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान केले. पावसाळ्यात खड्डे पडतात तेव्हा सरकारची यंत्रणा येऊन ते बुजवेल याची वाट न बघता स्वतः पोलिसच अनेक ठिकाणी रस्ते बुजवण्यासाठी पुढाकार घेतात. ऊन, पाऊस, थंडी कशाचीही तमा न बाळगता ते काम करतात. त्यामुळे पोलिसांसाठी आपण जेवढे करू, तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार काढत शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी खास कोटा ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की, वाहतूक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळेच वाहतूक पोलिसांचे काम आव्हानात्मक असते. शहरीकरणामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीची समस्या जटील होत आहे. पण आमचे वाहतूक पोलीस सातत्याने हे आव्हान पेलत आहेत. करोनासारख्या संकटाच्या काळातही पोलीस मागे हटले नाहीत. सेवा बजावताना ठाणे पोलीस दलातील १७९८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित झाले, तर दुर्दैवाने ३४ जण दगावले. मात्र, तरीही आमचा विभाग मागे हटला नाही, असे ते म्हणाले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेही समयोचित भाषण झाले. उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. करोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ऑनलाइन माध्यमातून रस्ते सुरक्षेविषयक लघुपट, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या विजेत्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच, वाहतूक पोलिसांचे कार्य व रस्ते सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या लघुनाटिका आणि नृत्यसंगीत कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या आजवरच्या इतिहासाची उकल करणाऱ्या ध्वनिचित्रफितीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच, अभिनेते प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या सादरीकरणालाही उपस्थित प्रेक्षकांनी खळखळून दाद दिली. वाहतूक विभागाला विशेष सहकार्य करणाऱ्या नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. पालकमंत्री शिंदे यांनी उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच ब्रँड अँबॅसिडर मंगेश देसाई यांचे विशेष कौतूक केले.