घरठाणेमनसे पदाधिकारी जमील शेख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकाचा नकार

मनसे पदाधिकारी जमील शेख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकाचा नकार

Subscribe

शहरातील मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची हत्या होऊन २४ तास उलटून देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान जो पर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तो पर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा जमील शेख यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. जमील शेख यांच्या हत्येत स्थानिक नगरसेवकाचा संबंध असल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. पोलिसांनी याबाबत मात्र तपास सुरु असून घटनास्थळी मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे, यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्यावर राबोडी बाजारपेठ, हॉटेल बिस्मिल्ला येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जमील शेख यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडून पळ काढला, या गोळीबारात जमील शेख यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरार घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या माध्यमातून मारेकऱ्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान जमील शेख यांचा मृतदेह पूर्वतपासणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आलेला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. मारेकऱ्यांना अटक होत नाही तो पर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेण्यात नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान या घटनेप्रकरणी राबोडी पोलिसांनी मनसे पदाधिकारी जमील शेख यांचे पुतणे फैसल शेख यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फैसल शेख याने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर संशय व्यक्त केला आहे, या हत्येमध्ये मुल्ला यांचा हात असल्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे. अनधिकृत बांधकामविरुद्ध जमील शेख हे मागील १० ते १२ वर्षांपासून आरटीआय मार्फत माहिती काढुन तक्रार करीत होते, तसेच २०१४ मध्ये जमील शेख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात नजीब मुल्ला यांच्यावर जमील शेख यांनी आरोप केला होता असे फैसल शेख याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी मात्र तपास सुरु असून तपासात अद्याप त्यांचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचे काही ठोस पुरावे मिळून आलेले नाही असे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती सांगितले.

नगरसेवक नजीब मुल्ला कोट

याबाबत नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, माझा या घटनेशी काहीही संबंध नसून राजकीय आकसापोटी माझे नाव या गुन्हयात घेण्यात येत आहे. तसेच २०१४ मध्ये जमील शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सर्व आरोपीना अटक करण्यात आलेली आहे, या आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आलेली माझा या गुन्ह्याशी संबंधच नसल्यामुळे माझे नाव यामध्ये आलेलेच नाही. २०१४ च्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे आरोपीपत्र देखील पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आले असून त्यात देखील माझे कुठेही नाव नसल्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

अविनाश जाधव कोट

पोलिसांनी आम्हाला ४८ तासांचा वेळ दिला आहे, या ४८ तासात मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली नाही तर मी स्वतः कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसणार असल्याचे मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -