मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामकरण नाना शंकरशेठ स्थानक करा

 ठाणे जिल्हा पत्रकार संघाद्वारे मुख्यमंत्र्यांना साकडे

mumbai central station
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक
भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार तथा ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यानुसार, प्राप्त निवेदनावर तातडीने शेरा मारून पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी दिली. मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी दैवज्ञ समाज तसेच नाना  शंकरशेठ प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने २० मार्च २०२० रोजी नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक खासदारांनी केंद्र सरकारला निवेदने दिली. समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत मंत्री, रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने तत्कालीन रेल्वे उपसंचालकांना नामकरण करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही रेल्वे राज्यमंत्री यांच्या कार्यालयाने दिले होते. मात्र, आजतागायत या नामांतराचे घोंगडे भिजत पडले आहे.
नाना शंकरशेट हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे. तसेच, राज्य सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. असा शेरा मारला आहे.दरम्यान, राज्यात धडाडीचे निर्णय घेणाऱ्या फडणवीस – शिंदे सरकारने या नामांतरा विषयी देशाच्या पंतप्रधानांकडे पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.  मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली धावली. या रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनस या स्थानकाला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडुन या महत्त्वपुर्ण विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे.