सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची २५ लाख रुपयांची फसवणूक

अंबरनाथ येथील शस्त्र आणि दारुगोळा निर्मिती कारखान्यातील कॅंटीनचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची २५ लाख रुपयांची फसवणूक.

अंबरनाथ येथील शस्त्र आणि दारुगोळा निर्मिती कारखान्यातील कॅंटीनचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा याच्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा हा अशाच एका गुन्ह्यात तुरुंगात असून लवकरच त्याचा ताबा घेऊन त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली.

ठाण्यातील मानपाडा चितळसर येथे राहणारे पोलीस अधिकारी संजय सुर्वे हे तीन वर्षापूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून अहमदनगर येथून सेवानिवृत्त झाले आहे. सुर्वे यांच्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यामुळे मुलाने हॉटेल व्यवसायात उतरावे, अशी इच्छा संजय सुर्वे यांची होती. दरम्यान, २०१५ मध्ये त्यांची ओळख ठाण्यातील हॉटेल व्यवसायिक रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा याच्यासोबत झाली. रोहित शेट्टी यांची हॉटेल व्यवसायिकांमध्ये ओळख असल्यामुळे तो आपल्याला मदत करील या अपेक्षेने सुर्वे यांनी रोहित शेट्टी याची भेट घेतली. रोहित शेट्टी याने केंद्र शासनाचा अखत्यारीत येणारे अंबरनाथ येथील शस्त्र आणि दारुगोळा कारखाना (ऑर्डीनन्स फॅक्टरी) काम करणारे भगवान पवार यांच्याशी सुर्वेंची भेट करून देत ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये असणारे कँटीनचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून २५ लाख रुपये घेतले. सुर्वे यांनी सेवानिवृत्ती मिळालेले रकमेतून रोहित शेट्टी यांना पैसे दिले होते. पैसे देऊनही बरेच महिने उलटूनही कंत्राट मिळत नसल्यामुळे सुर्वे यांनी माहिती मिळवली असता, असे कुठलेही कंत्राट येथून देण्यात येत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच संजय सुर्वे यांनी पैसे परत करण्यासाठी रोहित शेट्टी याच्याकडे पैशाचा तगादा लावला. मात्र, रोहित आणि भगवान पवार हे दोघे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. दरम्यान या दोघांनी यापूर्वी देखील याप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची माहिती सुर्वे यांना मिळाली असता त्यांनी महिन्याभरापूर्वी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा , भगवान पवार आणि पल्लवी पवार यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून चितळसर पोलीस ठाण्यात रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा , भगवान पवार आणि पल्लवी पवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वपोनि. जितेंद्र राठोड यांनी दिली.

कासारवडवली पोलीस ठाण्यात रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा आणि भगवान पवार यांच्या विरुद्ध यापूर्वी ऑर्डीनन्स फॅक्ट्रीरीच्या कॅंटीनचे कंत्राट मिळवणून देतो, असे सांगून आणखी एकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा याला अटक केली होती. भगवान पवार हा फरार असून तो पोलिसांना मिळून आलेला नाही. रोहित शेट्टी हा सध्या तळोजा तुरुंगात असून लवकरच त्याचा ताबा घेऊन त्याला अटक करण्यात येणार असून इतर दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वपोनि. राठोड यांनी आपलं महानगरला दिली.


हेही वाचा – चार महिन्यापासून वेतन थकीत; रेल्वे उद्घोषकाने केला आत्महत्येचा प्रयत्न