Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे अपघात टाळण्यासाठी पालिकेकडून गांधारी ब्रिजजवळील रिंगरोड बंद

अपघात टाळण्यासाठी पालिकेकडून गांधारी ब्रिजजवळील रिंगरोड बंद

Subscribe
कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून कल्याण रिंग रोड प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम सुरू असतानाही दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करत असून याठिकाणी अपघातांचे सत्र सुरू आहे. रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. वाहतूक विभाग, पोलिस प्रशासनाने येथे अपघात होत असून त्यात लक्ष घालण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली होती. अपघातांचे हे सत्र रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात गांधारी ब्रिजजवळ रस्त्यावर मोठे दगड रचत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
कल्याण, डोंबिवली, टिटवाळ्यासह ग्रामीण भागाला जोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. या रिंग रोडचे काम पूर्ण झाले नाही. रिंग रोड मार्गातील गावदेवी मंदिर कोलिवली ते गांधारी, बीएसयूपी प्रकल्प, अटाळी पूल, वडवलीपर्यंत या रस्त्याचे काम झालेले आहे. वडवली पुढील टप्प्याचे काम एमएमआरडीएच्या वतीने सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी काही दुचाकीस्वार या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करतात. तर निर्जनस्थळ असल्याने काही दुचाकीस्वार या रस्त्यावर स्टंटबाजी करत दुचाकी चालवतात. काही दुचाकीस्वारांचे ग्रुप या रस्त्यावर दुचाकी रेस लावतात. गेल्या दोन-तीन महिन्यांत या रस्त्यावर आठ अपघातांच्या घटना घडल्या असून तीन जणांनी आपला जीव गमावला आहे.
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी दगड लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर झीकझॅक पद्धतीने दगड लावून ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून काही दुचाकीस्वारांनी आपली वाहने रस्त्यावर घुसवली तरी त्यांच्या वाहनांचा वेग हा मर्यादित राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या रस्त्यांवर अपघात होत असल्याची माहिती पोलिसांकडून आम्हाला मिळाली. हे अपघात टाळण्यासाठी आम्ही हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे. एमएमआरडीएकडून या रस्त्याचे काम सुरू असून तो रस्ता अद्याप केडीएमसीकडे हस्तांतरित झालेला नाही. या रोडचे उर्वरित काम सुरू असून गांधारी ब्रिजजवळ हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पालिकेच्या घंटागाड्या येथून ये-जा करीत असल्याने या गाड्या ये-जा करण्यापुरता रस्ता चालू ठेवण्यात येईल. त्यासाठी झिकझॅक पद्धतीने दगड टाकण्यात येणार आहेत. जेणेकरून मोटरसायकलस्वार जरी या रस्त्यावर घुसले तरी ते भरधाव वेगाने गाडी चालवणार नाहीत अशी माहिती सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी दिली.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -