घरक्राइमघराचा दरवाजा उघडा ठेवला आणि दरोडा पडला! २ दिवसांनी दरोडेखोर अटकेत!

घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि दरोडा पडला! २ दिवसांनी दरोडेखोर अटकेत!

Subscribe

डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या चार जणांपैकी तिघांना विष्णू नगर पोलिसांनी अटक केली असून यातील महिला आरोपी फरार असून तिचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती विष्णू नगर पोलिसांनी दिली आहे. दरोड्याची घटना ५ जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी घडली होती. मात्र तक्रार दोन दिवसांनी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवून आठ तासातच तिघांना अटक केली आहे. चेतन रजनीकांत मकवाना (३७), अब्दुल जाहिददिन मोहम्मद शेख (४९) आणि दिनेश जशवंत रावळ (४२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून यातील महिला आरोपी फरार आहे. चेतन हा ठाण्यातील वागळे इस्टेट येथे राहणारा असून दिनेश हा ज्या इमारतीत दरोड्याचा गुन्हा घडला त्याच इमारतीत राहणारा आहे. तर अब्दुल हा रिक्षा चालक असून तो देखील डोम्बिवली परिसरात राहण्यास आहे. फरार असलेली महिला ही मीरा रोड येथे राहणारी आहे.

असा टाकला दरोडा!

डोंबिवली पश्चिम गुप्ते क्रॉस रोड, सुरजमनी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे अशोक अर्जुन गोरी (६१) हे सेवानिवृत्त बँक अधिकारी असून ते अपंग आहेत. गोरी हे पत्नी आणि मुलीसह वरील सोसायटीत राहतात. ५ जानेवारी रोजी सायंकाळी गोरी यांची पत्नी बाजारात गेली होती व मुलगी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. गोरी यांच्या घराचे दार अर्धवट उघडेच असताना एक महिला आणि दोन पुरुष घरत शिरले आणि त्यांनी दार बंद करून अशोक गोरी यांच्या गळ्यावर सुरा लावून त्यांचे हात पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली. तसेच, घराबाहेर जाण्यास मज्जाव केला. त्याच वेळी अशोक गोरी यांची मुलगी दूध घेऊन घरी आली असता तिने घरातील विजेचे दिवे लावत असताना या दरोडेखोरांनी गोरे यांच्या मुलीला देखील सुरा दाखवून तिला बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड करताच शेजारी धावत आले. दरम्यान या दरोडेखोरांनी शेजाऱ्यांना चाकूचा धाख दाखवत घरातील मोबाईल फोन आणि अडीच हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

- Advertisement -

असे सापडले दरोडेखोर!

या घटनेने घाबरलेले गोरे कुटुंबीय दोन दिवस घराबाहेर पडलेच नाहीत. शेजाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी ७ जानेवारी रोजी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विष्णू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडने आणि पथक यांनी तपास सुरु केला. पोलिसांना गोरे यांच्या घरातून एका मोबाईल फोन सापडला. हा मोबाईल फोन या दरोडेखोरांपैकी एकाचा असल्याचे समजताच तपासाला वेग आला. पोलीस पथकाने ताबडतोब सूत्रे फिरवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथून चेतन रजनीकांत मकवाना याला अटक केली. त्याच्या चौकशीत ही दरोड्याची योजना गोरे यांच्या इमारतीत राहणाऱ्या दिनेश रावळ याच्या मदतीने आखली होती, त्यासाठी रिक्षाचालक अब्दुल आणि प्रेयसीची मदत घेतल्याची कबुली चेतन याने दिली.

विष्णू नगर पोलीसांनी दिनेश आणि अब्दुल या दोघांना अटक करून त्याच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयातील महिला आरोपी फरार असून तिचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. पैशांची गरज असल्यामुळे तसेच गोरे हे बँक अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असतील, म्हणून ही दरोड्याची योजना आखली होती अशी कबुली या तिघांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तिघांना १२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -